ठाणे : ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे मासुंदा तलाव परिसर, कोर्टनाका, जांभळीनाका भागात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. दिवाळी उत्सव असला तरी अनेक नोकरदारांना कार्यालयीन सुट्ट्या नाहीत. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. ठाणे रेल्वे स्थानकाला जोडणारे नौपाडा, राम मारूती रोड, मासुंदा तलाव रोड परिसरात कोंडी झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून तरुण तरुणी या कार्यक्रमांच्या ठिकाणी जातात. ध्वनीक्षेपक वाजवून मोठ्या आवाजात येथे गाण्यांवर तरुण-तरुणी नृत्य करुन दिवाळी पहाट सण साजरा करतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा यामध्ये अधिक सामावेश असतो. या कार्यक्रमांसाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते अडविले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षातील नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील येथे उपस्थित असतात. या कालावधीत मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारूती रोड परिसरात मोठी गर्दी होत असते. यावर्षी देखील २० ऑक्टोबरला दिवाळी पहाट निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले आहेत. त्याचा परिणाम आता पर्यायी वाहतुक व्यवस्थेवर बसू लागला आहे.
काय झाले ?
दिवाळी सण असला तरी नोकरदारांना आज सुट्टी नाही. त्यामुळे अनेक नोकरदार कामानिमित्ताने घराबाहेर पडले. परंतु मासुंदा तलाव परिसरातील कार्यक्रमांमुळे कोर्टनाका ते टाॅवरनाका, चरई, राम मारूती रोड, नौपाडा भागात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. हे रस्ते ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोंडीमुळे नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.
पोलिसांनी लागू केलेले वाहतुक बदल काय?
- डाॅ. मूस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना डाॅ. मूस चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टाॅवरनाका, टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील.
- गडकरी चौक येथून डाॅ. मूस चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील अल्मेडा चौक, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास मार्गे वाहतुक करतील.
- घंटाळी मंदिर चौक येथून पु.ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना घंटाळी मंदिर जवळ प्रवेश बंदी असेल. येथील वाहने घंटाळी मंदिर येथून घंटाळी पथ मार्गे वाहतुक करतील.
- गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंप या मार्गावरील काका सोहनी पथ येथून पु.ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गजानन महाराज चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन पेट्रोल पंप, हरिनिवास चौक मार्गे किंवा घंटाळी मंदिर मार्गे वाहतुक करतील.
- राजमाता वडापाव सेंटर दुकान येथून गजानन महाराज चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना राजमाता वडापाव सेंटर दुकानाजवळ प्रवेशंबदी असून येथील वाहने सेंटरजवळून गोखले रोड मार्गे वाहतुक करु शकतील.
