ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणुक विभागाने प्रभाग रचना मसुदा नुकताच प्रसिद्ध करत त्यावर नागरिकांना हरकती सादर करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत केवळ पाच हरकती निवडणुक विभागाकडे दाखल झाल्या आहेत.
ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत ही १४ जानेवारी २०२३ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकीय राजवटीखाली सुरु आहे. त्यामुळे मागील २ वर्षापासून ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प प्रशासन सादर करत आहे. दोन ते पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपुर्वी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला दिले. यानंतर राज्य सरकारने निवडणुकीसाठी आवश्यक असलेली तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा निवडणुक विभागाने ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रभाग रचना तयार करून ती अंतिम करण्याचे काम सुरू केले आहे. या प्रक्रीयेसाठी जिल्हा निवडणुक विभागाने प्रभाग रचना मसुदा नुकताच प्रसिद्ध केला आहे.
हरकती पाठविण्याचे आवाहन
ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणुक विभागाने प्रभाग रचना मसुदा नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्याची प्रत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ तहसिलदार आणि पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने, हरकती आणि सूचना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. २१ जुलैनंतर आलेली निवेदने, हरकती, सूचना या विचारात घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे.
पाच हरकती दाखल ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणुक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचना मसुद्यावर हरकती दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत ५ हरकती केवळ दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये गटाला अमुक गावाचे नाव देणे अपेक्षित असताना दुसऱ्या गावाचे नाव देण्यात आले, क्षेत्र लांब असणे अशा अनेक हरकतींचा त्यात समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.