POSH Act made mandatory for women’s safety in private establishments : ठाणे : अनेक खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ केला जातो. मात्र, महिलांना याविषयी तक्रार करण्याची सुविधा नसते. त्यामुळे छळ करणाऱ्यांची मजल वाढते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी ठाणे महिला आणि बाल विकास विभागाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या निर्णयानुसार, ठाण्यात पोश कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून खासगी आस्थापनांत पोश कायदा सक्तीचा करण्यात आला आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ (पोश कायदा) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोश कायदा २०१३ मधील कलम ४ अन्वये ज्या कार्यालयामध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. ज्या खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करण्यात आलेली नाही, अशा आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, स्थानिक समिती तसेच उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांना आहेत, असे ठाणे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

दंडात्मक कारवाईचा इशारा

पोश कायद्यानुसार संबंधित आस्थापनांनी तात्काळ आपल्या कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, ठाणे यांना सादर करावा. ज्या आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती आढळून येणार नाही, अशा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी दिला आहे

अंतर्गत समितीची नोंदणी करा

खाजगी व शासकीय कार्यालयात स्थापन केलेल्या अंतर्गत समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या “शी बॉक्स संकेतस्थळावर” (SHE BOX Portal) करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी शी बॉक्स संकेतस्थळावर अंतर्गत समितीची नोंदणी करावी. शी बॉक्स संकेतस्थळावर अंतर्गत समिती नोंदविण्यासाठी https://shebox.wed.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मुखपृष्ठावर दाखविल्याप्रमाणे “अंतर्गत समिती नोंदणी (खाजगी मुख्य कार्यालय नोंदणी)” या टॅबवर स्पर्श करून आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशील भरावा आणि “सादर करा” या टॅबवर स्पर्श करून अंतर्गत समितीची माहिती नोंदवता येईल. यानंतर प्राप्त होणारा वापरकर्ता ओळख क्रमांक (User ID) आणि परवलीचा शब्द (Password) वापरून आपल्या आस्थापनाच्या अंतर्गत समितीची माहिती शी बॉक्स संकेतस्थळावर भरावी, असे नमिता शिंदे यांनी म्हटले आहे.