कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी करोना महासाथ काळात खरेदी केलेला दोन ट्रक गोळ्यांचा साठा पालिका आयुक्तांची मान्यता न घेता कचराभूमीवर विल्हेवाटीसाठी नेला. करोना काळात रूग्ण औषधाविना तडफडून मरत होते. अशा कालावधीत या औषध साठ्याचा उपयोग का नाही केला, असे प्रश्न उपस्थित करत कचराभूमीवर टाकण्यात आलेल्या करोना औषध साठ्याची सखोल चौकशी करावी, याप्रकरणातील दोषींना सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडेही आपण यासंदर्भात तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहोत, असे शहरप्रमुख सावंत यांनी सांगितले. चार वर्षापूर्वी करोना महासाथ सुरू असताना कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने फेव्हीपीर या गोळ्यांचा पुरेसा साठा केला होता. रुग्ण गरजेप्रमाणे या साठ्यातील गोळ्या वापरण्यात येत होत्या. सन २०२१ च्या नंतर महासाथीचा प्रभाव ओसरत गेला. अशा परिस्थितीत पालिकेने फेव्हिपीर या गोळ्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा का करू ठेवला. या गोळ्या शासनाकडून प्राप्त झाल्या की त्या उत्पादकांकडून खरेदी करण्यात आल्या होत्या. कोणते नियोजन करून या गोळ्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या सगळ्या प्रकरणात गंभीर अनियमितता, अपहाराचा संशय तक्रारदार सावंत यांनी व्यक्त केला आहे.
करोना महासाथ संपून आता तीन वर्ष उलटली तरीही सन २०२१ मध्ये खरेदी केलेला औषध साठा पालिकेने आपल्या औषध साठा केंद्रात का ठेवला. त्याची योग्य प्रक्रिया करून विल्हेवाट का लावली नाही. या औषधांची मुदत सन २०२३ मध्ये संपली आहे. तरीही त्यानंतर दोन वर्ष हा साठा औषध साठा केंद्रात पडून होता. पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी या साठयाची वेळोवेळी माहिती घेतली होती का. त्यांनी मुदत संपलेल्या या औषध साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी का पुढाकार घेतला नाही, असे प्रश्न शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
या औषध साठा प्रकरणात जे जबाबदार वैद्यकीय अधिकारी, औषध साठा नियंत्रक कर्मचारी, औषधे खरेदी करणारे कर्मचारी यांची सखोल चौकशी करावी. या प्रकरणात पालिकेचे आर्थिक नुकसान झाले असेल तर जबाबदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्यात यावी. त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. हे प्रकरण पालिकेने दडपण्याचा प्रयत्न केला तर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख सावंत यांनी दिला आहे.
करोना महासाथीच्या काळातील कोट्यवधी रूपये किमतीची सुमारे चार लाख गोळ्यांची औषधे गुपचूप विल्हेवाट लावण्यात येत होती. म्हणजे यात काहीतरी काळेबेरे आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. – अभिजीत सावंत, शहरप्रमुख, ठाकरे गट, डोंबिवली.