Thane News : ठाणे : गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. परंतु हा उत्सव पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येत असून त्याचबरोबर गणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत. अशाच प्रकारे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेकडूनही तयारी करण्यात येत असून त्याचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अनमोल सागर (Anmol Sagar ) यांनी गणेश मंडळ, पोलीस विभाग आणि विविध यंत्रणांसोबत नुकतीच संयुक्त बैठक घेतली. त्यात त्यांनी विविध विभागांसह गणेश मंडळांना महत्वाची सूचना केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीस अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक पोलीस आयुक्त भिवंडी पूर्व सचिन सांगळे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई आणि महामंडळाचे सदस्य, उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे, उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षीरसागर, शहर अभियंता जमिल पटेल, भिवंडी वाहतुक विभाग अनंता वाघ, वरीष्ठ पोलीस निरीक्षक तसेच महापालिका अधिकारी वर्ग उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त पोलीस सचिन सांगळे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच गणेशोत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्णपणे साजरा करण्याकरिता पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
गणेश मंडळांची मागणी
या बैठकीमध्ये सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष मदन भोई आणि सदस्यांनी बैठकीमध्ये विविध बाबींचा उल्लेख करून त्या गणेशोत्सवापुर्वी पुर्ण करण्याची विनंती केली. यामध्ये प्रामुख्याने गणेश आगमन आणि विसर्जन मार्गातील रस्त्याची दुरुस्ती, गणेश विसर्जन घाट, तलाव दुरुस्ती, विसर्जन घाटावरील जीवनरक्षकांचे सुरक्षा विम्या बाबत, विसर्जन घाटावरील जीवनरक्षकांना कामाचा योग्य तो मोबदला देणे, चांगले जेवण देणे, मंडळांना आवश्यक त्या परवानग्या तात्काळ देणे, गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर विद्युत व्यवस्था करणे, गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील अतिक्रमण हटविणे, तसेच विसर्जन घाटावर गणेश मंडळाच्या मागणीनुसार तराफे, क्रेन, लिफ्टर उपलब्ध करून देण्यात यावे, अशा मागण्या केल्या.
गणेशोत्सवासाठी ही कामे करण्यात येणार
आयुक्त अनमोल सागर यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंडळांनी केलेल्या मागण्या महापालिका आणि पोलीस यंत्रणे मार्फत नक्कीच पुर्ण करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त सागर यांनी दिले. तसेच गणेश आगमन आणि विसर्जन मार्गातील रस्त्याचे काम सुरु केले असून प्रत्येक ठिकाणी अधिकारी तैनात केले आहेत. त्यावर प्रशासनाचे पुर्ण लक्ष असणार आहे. विसर्जन घाटांची दुरुस्तीही करण्याचे काम सुरू आहे. वऱ्हाळदेवी तलावात गणेशोत्सवाच्या १० दिवस आधी पॉटेशिअम पॅरमॅगनेटचे औषध फवारणी करून पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन घाटांचा कचरा दररोज उचलणे आणि त्याठिकाणी जंतूनाशक, दुर्गंधीनाशक औषध फवारणी करणे, सर्व विसर्जन घाटांवर तसेच कृत्रिम तलावा शेजारी निर्माल्य कलश व्यवस्था करणे, अशी कामे करण्यात येणार आहेत. तसेच गणोशोत्सव काळात शहरातील विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे आयुक्त सागर यांनी सांगितले.
थर्माकॉल, प्लास्टीकच्या पिशव्याबाबत सल्ला
पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा, मंडपाच्या २० ते ३० मिटर परिसरमध्ये थर्माकॉल आणि प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर होणार नाही यासाठी मंडळातील १ सदस्याची नेमणुक करावी, अशी सूचना त्यांनी मंडळांना केली. मंडपाच्या ठिकाणचा कचरा दररोज उचलणे आणि त्याठिकाणी जंतूनाशक व दुर्गंधीनाशक औषध फवारणी महानगरपालिकमार्फत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
गणेश भक्तांना आवाहन
विविध ठिकाणी कृत्रीम तलाव उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत गणेश मूर्ती विसर्जनासाठी जास्तीत जास्त कृत्रीम तलावांचा वापर करावा, अशी सूचना आयुक्त सागर यांनी केली. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक साजरा करुन महानगरपालिका तसेच पोलीस यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी भाविकांना केले.
