बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ओसंडून वाहू लागले. गेल्या अनेक दिवसांपासून बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा होती. आता बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली आहे. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील नागरी आणि औद्योगिक तहान भागवली जाते.
ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि औद्योगिक क्षेत्राला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि शासकीय संस्थांचे डोळे लागलेले असतात. यंदाच्या वर्षात बारवी धरणात खूप लवकर पाणी साठवण्यास सुरुवात झाली. यंदा पश्चिम विक्षोभ असल्याने मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली.
मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला. त्यानंतर मोसमी पाऊस मे महिन्याच्या शेवटी सुरू झाला . त्यामुळे महिन्यात बारवी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झाले नाही. परिणामी यंदाच्या वर्षात बारवी धरण लवकर भरेल अशी आशा होती. मात्र जून महिन्यात जोरदार कोसळल्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी बारवी धरणाचा मंदावलेला जलसाठा पुन्हा वेगाने होऊ लागला. शुक्रवारी बारवी धरण ९८ टक्क्यांपेक्षा अधिक भरले होते. तर शनिवारी सकाळी बारावी धरणाची एकूण उंची ७२.६० मीटर गाठण्यासाठी अवघे काही सेंटीमीटर शिल्लक होते. शनिवारी सकाळपासून झालेल्या दमदार पावसाने धरणात पाणीसाठा वाढवला.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ३ वाजून २५ मिनिटांनी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. सध्या धरणातून ४ क्युसेक प्रति सेकंद पाणी विसर्ग सुरू झाला आहे. एमआयडीसी प्रशासनाने यापूर्वीच नदीकाठच्या ग्रामस्थांना आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले होते. उल्हास नदीची पाणी पातळी कमी असल्याने धरणातून पाणी सोडल्याने आसपासचे गावांना धोका नाही. जिल्ह्याची पाणी चिंता मात्र मिटली आहे.