Traffic Congestion In Thane Bhivandi Ghodbader Road: ठाणे जिल्ह्यात शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवार दुपारपर्यंत कायम होता. याच काळात ठाणे, घोडबंदर आणि भिवंडी शहरातील महामार्गांसह अंतर्गत मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. दहा मिनीटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याने नागरिक हैराण झाले होते. विविध प्रकल्पांच्या कामामुळे अरुंद झालेले रस्ते आणि पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे ही कोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
ठाणे, घोडबंदर आणि भिवंडी शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. घोडबंदर आणि ठाणे मार्गावर मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. याशिवाय, घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा जोडणीचे काम सुरू आहे. आनंदनगर भागात त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे तर, मानपाडा येथे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शुक्रवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढला असून शनिवार दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यामुळे वाहतूकीचा वेग काहीसा मंदावला होता. त्यातच विविध प्रकल्पांच्या कामामुळे अरुंद झालेले रस्ते आणि पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे ही कोंडी झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच शहरातील अंतर्गत मार्गांवरही कोंडी दिसून आली.
मुंबई-नाशिक महामार्गही वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जातो. याशिवाय, भिवंडी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. याठिकाणी गेल्या काही वर्षात नागरी वस्तीही वाढली आहे. या भागातील गोदामांच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांच्या वाहनांचाही भार वाढला आहे. या मार्गावरही वाहतूक कोंडी होत आहे. काल्हेर भागात वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. मुंबई-नाशिक महमार्गावर मानकोली नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी होती. दहा मिनीटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा अवधी लागत असल्याने नागरिक हैराण झाले होते.
अवजड वाहतूकीचा भार
ठाणे आणि भिवंडी या दोन्ही शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. संथगतीने सुरू असणाऱ्या या वाहतूकीमुळे कोंडी होते. याविरोधात नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटताच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसा अवजड वाहतूक बंद केली होती. मात्र, दोनच दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मागे घेत पुन्हा दिवसा अवजड वाहतूकीला परवानगी दिली. यापुर्वी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत अवजड वाहतूकीला परवानगी होती. मात्र, आता नव्या आदेशानुसार सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवजड वाहतूकीला परवानगी देण्यात आली असून या वाहतूकीमुळेही शनिवारी कोंडीत भर पडली.