ठाणे : मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी घोडबंदर मार्ग महत्वाचा मानला जात आहे. या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून कापुरबावडी येथील खांबांवर तुळई (गर्डर) बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान, अपघात किंवा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावरील ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवार रात्रीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात येणार आहे.
नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. ही वाहने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात. याशिवाय, या मार्गावरून दुपार आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
सततच्या वाहन वर्दळीमुळे या मार्गावर कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे हा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद झाला असून येथील चिंचोळ्या मार्गामुळेही कोंडीत भर पडत आहे. असे असतानाच, कापुरबावडी येथील खांबांवर तुळई (गर्डर) बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान, अपघात किंवा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर मोठे वाहतूक बदल लागू केले आहेत.
यानुसार, या मार्गावरील ठाणे-घोडबंदर मार्गिका ५ ते ९ जुलै या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ७ यावेळेत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसुचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढली आहे. ही अधिसुचना पोलीस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, प्राणवायु पुरवठा वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
असे आहेत वाहतूक बदल
ठाणे- घोडबंदर मार्गिकेवरील कॅपीटल हॉटेल समोरील रस्त्याने कापुरवावडी सर्कल मार्गे घोडबंदर, कोलशेत आणि भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गोल्डन क्रॉस येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहने ही गोल्डन क्रॉस येथुन माजिवाडा ओव्हर ब्रिज खालुन पुढे सरळ जावुन कापुरबावडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच ही वाहने रवि स्टील नाका येथुन डावे बाजुस वळण घेवुन पोखरण रोड नं.२. मार्गे इच्छीत स्थळी जातील.
ठाणे – घोडबंदर मार्गिकेवरील माजिवाडा ओव्हर ब्रिज वरुन कॅपीटल हॉटेल समोरील ब्रिज उतरणी येथून कापुरवावडी सर्कल मार्गे कोलशेत अथवा बाळकुम, भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ज्युपिटर रुग्णालयासमोरील मुख्य आणि सेवा रस्त्याला जोडणाऱ्या भागातून प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. या मार्गावरुन जाणारे सर्व प्रकारची वाहने ही ज्युपिटर हॉस्पीटल समोरील रस्त्याने पुढे सरळ जाऊन गोल्डन क्रॉस येथुन माजिवाडा ओव्हरब्रिज खालुन कापुरवावडी सर्कल मार्गे इनिछत स्थळी जातील.
हे काम करण्यात येणार
कापुरबावडी सर्कल समोरील नाला पुलावर मेट्रो मार्गिका ४ चे उभारलेले खांब क्रमांक २२ आणि २३ वर स्टील गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी ५०० टनी दोन क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. या क्रेन ठाणे- घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी सर्कल समोरील रस्त्यावर तसेच सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या पुलावर उभे करण्यात येणार आहेत.