Thane Traffic : ठाणे : घोडबंदर मार्गावर खड्डे, वाहतुक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवासी त्रासले असताना घोडबंदर मार्गावरील करपे कंपाऊंड परिसरात तीन वाहने बंद पडली होती. तसेच मोठा खड्डा पडल्याने मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. येथील गायमुख घाट, कासारवडवली, भाईंदर पाडा, फाऊंटनरोड, मिरा भाईंदर येथील नवघर पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांना १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागत होता. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक सुरु केल्याने कोंडीत भर पडली.
घोडबंदर मार्गावरून लाखो वाहने वाहतुक करत असतात. हा मार्ग ठाण्याहून बोरीवली, मिरा भाईंदर, वसई-विरार, पालघर, गुजरातच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी महत्त्वाचा आहे. गुजरात येथून भिवंडी, उरण येथील जेएनपीए बंदरात जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.
शुक्रवारी सकाळी मिरा भाईंदर क्षेत्रातील करपे कंपाऊंड येथे तीन वाहने अचानक बंद पडल्या. येथील वाहने पोलिसांनी यंत्रणेच्या साहाय्याने बाजूला केली. त्यानंतर वाहतुक सुरळीत होईल असे वाटत होते. परंतु याठिकाणी मोठा खड्डा पडल्याने वाहने बाजूला करुनही वाहतुक संथपणे सुरु होती. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. शुक्रवारी दिवसभर मिरा भाईंदर येथील नवघर ते ठाण्यातील कासारवडवली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीमुळे अनेक बसगाड्या, वाहने कोंडीत अडकून होती. अवघ्या काही मिनीटांचे अंतर पार करताना प्रवाशांच्या नाकी नऊ आले होते. कोंडी केव्हा सुटणार असा प्रश्न वाहन चालक आणि प्रवाशांना पडला होता.
ठाणे पोलिसांचे आवाहन
घोडबंदर मार्गावर दुपारी वाहनांचा भार वाढला. त्यामुळे काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोंडीत भर पडली. ठाणे पोलिसांनी या मार्गावरून वाहतुक टाळावी असे आवाहन वाहन चालक आणि प्रवाशांना केले. वाहतुक कोंडी सायंकाळी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांचे हाल
वसई-विरार भागातून हजारो नोकरदार ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करतात. परंतु वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. कोंडी वाढू लागल्याने वाहन चालकांना अवघ्या १५ ते २० मिनीटांचे अंतर गाठण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागत होता.