Ganeshotsav 2025 : ठाणे – गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात गणपतीचे आगमन सार्वजनिक मंडपात आणि घरोघरी झाले आहे. परंतू, ठाण्यातील एक घरगुती गणपती असा आहे की त्या घरगुती गणपतीची इच्छापूर्तीचा गणपती म्हणून ख्याती आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी अनेक सिने कलाकार देखील दर्शनासाठी येतात.

गणपती एकच असला, तरी त्याचे रूप, त्याच्या स्वागताचा थाट आणि सजावट प्रत्येक घराघरात वेगवेगळ्या रूपात अनुभवायला मिळते. राज्यभरात २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतीचे देखील मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे मुंबई शहरासह इतर शहरात देखील गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.

ठाणे शहरातील घोडबंदर भागात राहणारे समेळ कुटूंबातील गणपतीला १२५ वर्षाची परंपरा लाभली आहे. यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत हे कुटूंब मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा करत आहेत. बालगणेशाचे गोडरूप यात साकारले जात असून सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्याची देखील विशेष परंपरा आहे. तर, इच्छापूर्ती गणपती अशी ख्याती असून अनेक सिने कलाकार देखील या कुटूंबाच्या गणपतीला दर्शनसाठी आवर्जून हजेरी लावत असतात.

घरगुती गणपतींमध्ये मानाचा गणपती म्हणून समेळ परिवाराचा गणपती ओळखला जातो. सन १९०० पासून ही परंपरा आलिबाग येथील चौल येथे समाजसेवक रामचंद्र समेळ यांनी मोठ्या आनंदात सुरूवात केली. आज या उत्सवाला १२५ वर्षे झाली असून ही परंपरा नातू रविंद्र समेळ यांनी आजही जोपासली आहे. रविंद्र रमाकांत समेळ यांच्या आजोबांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही त्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने चालू आहे. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही मूर्ती मातीपासून घडविण्यात येत असते. बालगणेशाचे गोड रूप यात साकारल जात असते. शिवाय या गणेशाला सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्याची देखील विशेष परंपरा आहे. मूर्तीचे आगमन असो किंवा विसर्जन दोन्ही प्रसंगी मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.

दरम्यान, १२५ वर्षाची परंपरा असलेल्या गणेशाला इच्छापूर्ती गणपती म्हणून या स्वयंभू गणेशाची ख्याती आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ही मूर्ती एकाच स्वरूपात घडवली जाते, मुर्तीकार पालेकर यांच्या समवेत रविंद्र समेळ स्वतः रंगभूषाकार असल्याने जातीने लक्ष देत, ही मूर्ती घडवतात तसेच नामवंत सिने कलाकार या मूर्तीच्या दर्शनाला येतात. गणेश चतुर्थीचा हा १० दिवसांचा सोहळा, दीड दिवसातही मोठ्या भक्तिभावाने आणि प्रेमाने समेळ कुटुंबीय साजरा करत असतात, अशी माहिती रेवा समेळ यांनी दिली.