Navratri2025 : ठाणे: अनंत चतूर्दशीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी गणेशभक्तांनी साश्रुनयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. आता, नवरात्रौत्सवासाठी सर्वजण सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन आठवड्यांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. परंतू, यंदाचा नवरात्रौत्सव खास असल्याचे म्हटले जात आहे. त्याचे कारण देखील तितकेच महत्वाचे आहे.
गणेशोत्सवाप्रमाणे नवारत्रौत्सव देखील सर्वांच्या आवडतीचा उत्सव आहे. आश्विन महिन्यातील नवरात्र भारतात मोठ्याप्रमाणात साजरी केली जाते. आश्विन महिन्यात साजरी केली जाणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हटले जाते. संपूर्ण नऊ दिवस अनेक भक्त नऊ दिवस उपवास करतात. तसेच यादिवसात दांडिया, गरबा असे खेळ खेळले जातात. या नऊ दिवसात देवीच्या विविध नऊ रुपांची पूजा केली जाते. परंतू, यंदा २०२५ मधील शारदीय नवरात्र काही विशेष आहे. पंचांगानुसार, शारदीय नवरात्र २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे आणि २ ऑक्टोबर २०२५ रोजी दुर्गा विसर्जनासह विजयादशमी(दसरा) साजरी केली जाणार आहे.
मूर्तीकारांची मूर्ती घडविण्यासाठी लगबग
गणेशोत्सवा पाठोपाठ आता नवरात्रौत्सवाचे वेध सर्वांना लागले आहेत. नवरात्रौत्सवाला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे देवीची मूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. कारखान्यांमध्ये मूर्तीकार देवीची मूर्ती घडविण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत.
महिलांसाठी नवरात्रौत्सव महत्वाचा का ?
नवारात्रौत्सव महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. कारण, या नऊ दिवसाच्या कालावधीत विशेष दिवसाचा रंग ठरविला जातो. त्या दिवशी त्या – त्या रंगाचे कपडे परिधान करण्यास महिलांना विशेष आवडते. यासाठी महिला नवरात्रीचे नऊ रंग कधी येणार याची आतुरतेने वाट पाहतात.
हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे रंग
दिवस | रंग |
सोमवार, २२ सप्टेंबर | पांढरा |
मंगळवार, २३ सप्टेंबर | लाल |
बुधवार, २४ सप्टेंबर | निळा |
गुरुवार, २५ सप्टेंबर | पिवळा |
शुक्रवार, २६ सप्टेंबर | हिरवा |
शनिवार, २७ सप्टेंबर | राखाडी |
रविवार, २८ सप्टेंबर | केशरी |
सोमवार, २९ सप्टेंबर | मोरपिसी |
मंगळवार, ३० सप्टेंबर | गुलाबी |
यंदाची नवरात्री विशेष का ?
पंचांगानुसार, यंदा २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना असून याच दिवशी देवीची प्रतिष्ठापना होणार आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्री साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे यंदाची शारदीय नवरात्र फक्त नऊ दिवसांची नसून पूर्ण दहा दिवसांची (10DaysNavratri) असेल. याचे कारण म्हणजे तृतीया तिथी दोन दिवस, म्हणजेच २४ आणि २५ सप्टेंबर, टिकणार आहे. त्यामुळे या वर्षी दहा दिवसांच्या नवरात्रीचा योग निर्माण झाला असून भक्तांसाठी ती अधिक महत्त्वपूर्ण आणि शुभ मानली जात आहे.