ठाणे : ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांची दैना झाली असताना, शहरातील अंतर्गत मार्गावरही ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचाही सामावेश आहे. शहरातील मुख्य मार्गावर दररोज कोंडी होत असताना आता अंतर्गत मार्गांवरही खड्डे पडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच महापालिकेसह इतर काही प्राधिकरणांनी रस्ते खोदून ठेवले असून त्याची दुरुस्तीही पूर्ण झाली नाही. त्यामुळे या रस्त्यांची स्थिती देखील वाईट झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण यासारखे मुख्य मार्ग आहेत. या रस्त्यांना जोडणारे शहरात अनेक अंतर्गत मार्ग आहेत. तसेच ठाणे रेल्वे स्थानक किंवा कळवा, बाजारपेठ गाठण्यासाठी शहरातील अंतर्गत मार्ग महत्त्वाचे ठरतात. गेल्याकाही दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याची स्थिती अंत्यत वाईट आहे. काही ठिकाणी रस्ते असमान झाल्याने अपघातांची भिती देखील आहे. तसेच वाहतुक संथ होऊन त्याचा परिणाम शहरातील वाहतुक व्यवस्थेवर होतो. मुख्य मार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी अनेकजण अंतर्गत मार्गाचा वापर करतात. परंतु शहरातील अंतर्गत मार्गावर देखील खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी ठाणे महापालिका किंवा इतर प्राधिकरणाने रस्ते खणले आहेत. हे रस्ते पूर्णत: दुरुस्त केले नसल्याने या रस्त्यांची स्थिती देखील वाईट आहे.

शहरातील ठाणे रेल्वे स्थानकालगत असलेला नौपाडा-बी-केबीन रोड, गावदेवी चौक, कळवा-विटावा मार्ग, मनोरमानगर, ढोकाळी-कोलशेत येथील मार्ग यासह काही भागात खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांचा नाहक त्रास प्रवासी, वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांची स्थिती बिकट आहे. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त करणे आवश्यक होते. राजेश पिल्ले, रहिवासी.