Manoj Jarange Patil Mumbai Protest: : ठाणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तिथे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्या निघाल्या होत्या. त्यावेळी, काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीचा घेराव घालून पाण्याच्या बाटल्या फेकल्या. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याची सर्वत्र आता चर्चा होत आहे.

मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मराठा समाजाचे लोक तिथे मोठ्या संख्येने तिथे जमले आहेत. अनेक राजकीय नेते उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. अशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील रविवारी आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, तिथून निघताना काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारला घेराव घातला. तसेच त्यांच्या कारवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यावर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सर्व आंदोलकांना आवाहन केलं की इथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याला सन्मानाने वागवा.

जरांगे यांचे आवाहन

अरे पोरांनो, नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घातला तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. इथे कोणीही येऊ द्या, भाजपाचा नेता किंवा आणखी कुठल्या पक्षाचा नेता, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा किंवा इतर पक्षाचा नेता इथे आल्यावर त्याला सन्मानाने वागवा. आपल्याला सहन होतंय तोवर त्यांचा सन्मान करायचा. परंतु, जेव्हा आपल्याला वाटेल की आरक्षण मिळत नाही तेव्हा बघू काय करायचं. परंतु, सध्या कुठल्याही पक्षाचा नेता इथे आला तरी उलट बोलू नका. आता सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते.

जितेंद्र आव्हाड यांची सोशल मीडियावर पोस्ट

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “अभिमान आहे आम्हाला मराठ्यांनी लाडक्या बहिणीला प्रश्न विचारले , सरकारने लाडक्या बहिणीला फसवण्याचे काम केले, पण महाराष्ट्राच्या लाडक्या ताईला हक्काने विचारले प्रश्न ,ही महाराष्ट्राची ताई मराठ्यांना कधीच एकट सोडणार नाही . मराठ्यांचा हा द्वेष , राग बहिणी बद्दल नाही तर वारंवार मराठ्यांची टिंगल करणाऱ्या सरकार बद्दल आहे.”