ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचे काम पूर्ण झाले असले तरी या मार्गिकेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जात आहे. उपनगरीय रेल्वेगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करुनही उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये केलेले बदल, वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या विनाकारण वाढविलेल्या फेऱ्या आणि मालगाड्यांची उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या मार्गिकेवरून सुरू असलेली वाहतूक यामुळे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रवाशांचे हाल असेच सुरू राहिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रवासी संघटनांकडून दिला जात आहे.

ठाणे आणि त्यापल्ल्याडील लाखो नोकरदार मुंबई, नवी मुबंईच्या दिशेने उपनगरीय रेल्वेतून प्रवास करत असतात. उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांच्या तुलनेत दैनंदिन प्रवाशांची संख्या ही कैक पटीने अधिक आहे. गर्दीच्या वेळेत धावत्या गाड्यांमधून पडून प्रवासी मृत्यू तसेच गंभीर जखमी झाल्याच्या घटनाही यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतूकीमुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांचा खोळंबा होत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणास २००८ मध्ये मंजूरी दिली होती. त्यानुसार हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले होते. रेल्वे प्रवासी देखील हा प्रकल्प केव्हा पूर्ण होईल याची प्रतिक्षा करत होते. अखेर मंजूरी नंतर तब्बल १४ वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण झाला. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढतील असे वर्तविले जात होते. परंतु या मार्गिकेवर रेल्वे प्रशासनाने सामान्य उपनगरीय रेल्वेगाड्यां ऐवजी वातानुकूलीत रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. यातील अनेक वातानुकूलीत रेल्वेगाड्या या रिकाम्या धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच प्रशासनाने गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केला आहे. यामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात टिकेची झोड उठविली जात आहे.

उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या वाहतूकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्या असल्या तरीही गेल्याकाही दिवसांपासून मालगाड्यांची वाहतूकही उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या रेल्वे मार्गिकेवरून सुरू असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेकडून केला जात आहे. पूर्वी मालगाड्या पारसिक बोगद्यातून धावत होत्या. त्यामुळे कळवा आणि मुंब्रा येथील रेतीबंदर भागात राहणाऱ्या नागरिकांची झोपमोड होत आहे. असा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जात आहे. या सर्व प्रकारांमुळे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यासंदर्भात उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांना विचारले असता, प्रशासनाने वातानुकूलीत रेल्वेगाड्या सोडाव्यात. परंतु प्रवाशांना सामान्य रेल्वेगाड्यांची गरज सध्या अधिक होती. असे सांगितले. तसेच रेल्वे प्रवाशांच्या समस्या घेऊन रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्यथा रस्त्यावर उतरू

रेतीबंदर भागातून मालगाड्या धावत असल्याने त्याच्या आवाजाने परिसरातील वृद्ध नागरिक, बालके यांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वातानुकूलीत गाड्या रिकाम्या धावत आहेत. तर सर्वसामान्य प्रवासी सामान्य उपनगरीय गाड्यांमध्ये करोना काळातही प्रचंड गर्दीत प्रवास करत आहेत. पाचवी आणि सहावी मार्गिकेचा प्रकल्प पूर्ण होऊनही त्याचा उपयोग झालेला नाही. नागरिकांचे हाल सुरू राहिल्यास रस्त्यावर उतरून रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.- सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा-पारसिक रेल्वे प्रवासी संघटना.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.