भूसंपादन, अतिक्रमणांचे अडथळे दूर करण्यासाठी निर्णय; ठाणे ते भिवंडी टप्पा लवकर सुरू करण्याचे प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयेश सामंत

ठाणे : ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने करता यावी यासाठी या प्रकल्पाची कारशेड भिवंडी तालुक्यातील कोनगावऐवजी कशेळी येथे अभयारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडी-कल्याण या दुसऱ्या टप्प्यातील कामात उभे राहात असलेले अडथळे आणि कोनगाव भागातील प्रस्तावित जागेतील अतिक्रमणांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने कारशेडची जागा कशेळी येथे निश्चित करण्यात आली आहे. सुमारे २० हेक्टर दलदलीच्या जागेत ही कारशेड उभारण्यात येणार आहे.

 मुंबई-ठाणे मेट्रो प्रकल्पाचा पुढे कल्याणपर्यंत विस्तार करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम ठाणे ते भिवंडी आणि पुढे भिवंडी ते कल्याण अशा दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. या प्रकल्पात ठाणे ते भिवंडी या पहिल्या टप्प्याची लांबी १२.७ किलोमीटर इतकी असून एकूण सहा मेट्रो स्थानके यामध्ये मोडतात. मेसर्स अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत या प्रकल्पाच्या स्थापत्य कामांना ऑगस्ट २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गिकेमध्ये पुनर्वसन तसेच वसाहतींच्या पुनर्बाधणीसारख्या अडचणी नसल्याने पहिल्या टप्प्यातील स्थापत्य कामे ४० टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

कारशेडचा खर्च वाढणार

या प्रकल्पासाठी कोनगाव भागात कारशेड ठरवण्यात आली होती. मात्र, येथील जागेवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली असून ती हटवण्यास स्थानिकांचा मोठा विरोध होत आहे.  ठाणे-भिवंडीदरम्यान मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा लगतच्या काळात पूर्ण झाल्यास ही मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कारशेड याच पट्टय़ात असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कशेळी भागात २०.६३ हेक्टर इतकी जागा मेट्रो कारडेपोसाठी नक्की करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जागा दलदलीची असली तरी तिची सुधारणा होऊ शकते, तसेच तांत्रिकदृष्टय़ा ती योग्य असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र या जागेसाठी १० ते १२ कोटी रुपये एमएमआरडीएला अधिकचे मोजावे लागतील असे चित्र आहे. कशेळी येथील दोन लाख २५ हजार चौरस मीटर जागेसाठी ४१ कोटी रुपये मोजण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दुसऱ्या टप्प्यातील अडचणी कायम

या प्रकल्पातील भिवंडी-कल्याण या दुसऱ्या टप्प्यातील कामात मात्र अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. या टप्प्यातील तब्बल ३ किलोमीटर अंतराच्या टप्प्यात काम सुरू करण्यास पुरेशी जागाच उपलब्ध नाही. येथे स्थापत्य कामांसाठी आवश्यक असलेले साहित्य कोठे उतरवायचे हा प्रश्न प्राधिकरणापुढे आहे. याशिवाय या टप्प्यात मूळ मार्गिकेमध्ये काही बदल करावेत यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे आग्रही आहेत. या मागण्यांचे विश्लेषण एमएमआरडीएच्या स्तरावर सुरू आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्याचे काम अगदीच रखडले असून कारशेडचे कामही वेळेत पूर्ण झाले नाही तर ठाणे-भिवंडीदरम्यान पहिला टप्पा लवकर पूर्ण होऊनही कार्यान्वित करता येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत बनले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane kalyan metro shed kasheli ysh
First published on: 19-11-2021 at 01:07 IST