ठाणे : येथील कोलशेत भागातील वायु सेनेच्या स्थानकाजवळील अकबर कॅम्प परिसरातील रस्त्यावर फेरिवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून त्याचबरोबर या गाड्यांवरील ज्वालाग्राही उपकरणांमुळे स्फोट होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या संदर्भात वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने आता कोलशेत रस्त्यावरील डि-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायु सेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरिवाला क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा रस्ता फेरिवालामुक्त होण्याची चिन्हे आहेत.

घोडबंदर रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून ओळखले जाते. या मार्गावरून अनेक नागरिक प्रवास करतात. काही वर्षांपुर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. घोडबंदरच्या मुख्य मार्गावर कोंडी होत आहे. ती टाळण्यासाठी अनेकजण कोलशेत मार्गेच प्रवास करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर फेरिवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

या रस्त्यावरील डि-मार्ट पासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायु सेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस फेरिवाले ठाण मांडून बसत आहेत. रस्त्यावर तसेच पदपथावर फेरिवाले गाड्या लावत असून यामध्ये खाद्य पदार्थांच्या गाड्यांसह पानटपऱ्यांचा समावेश आहे. पानटपऱ्या आणि खाद्य पदार्थ बनविणाऱ्या गाड्यांवर राजरोजपणे गॅस आणि स्टोव्हसारखी उपकरणे वापरली जात असून या गाड्या रात्री उशीरापर्यंत सुरू असतात.

अकबर कॅम्प रोडला लागूनच भारतीय वायु सेनेचे स्थानक आहे. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात पानटपऱ्या आणि खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्यांमध्ये मोठी वाढ होत असून यामुळे सुरक्षिततेचा आणि वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे. याच परिसरात आयटीपार्क असून तेथील कर्मचारी या गाड्यांवर खाद्य पदार्थ खरेदीसाठी गर्दी करतात. याठिकाणी किरकोळ अपघातही घडत असतात.

गाड्यांवरील ज्वलनशील उपकरणांचा स्फोट झाल्यास मनुष्यहानी तसेच वित्तहानी होऊ शकते. या गाड्यांचा त्रास पादचारी आणि लोढा अमारा आणि लोढा स्टर्लिंग या गृहसंकुलातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून कारवाई करून गाड्या हटविण्याची मागणी होत होती. अशी मागणी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने आता कोलशेत रस्त्यावरील डि-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायु सेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरिवाला क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याठिकाणी नो पार्किंग क्षेत्र असे फलकही लावण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास प्रशाकीय सभेने मान्यता दिल्याने हा परिसर फेरिवालामुक्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.