ठाणे : ठाणे मोटार अपघात न्यायाधिकरणासमोर दाखल झालेल्या मोटार अपघात दाव्यामध्ये मृत दुचाकीस्वाराच्या कुटुंबियांना तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राष्ट्रीय लोक अदालतमध्ये घेण्यात आला. ठाणे येथे शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीतील हा दावा निकाली काढण्यात आल्याने मृत दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात संतोष उत्तम तायगडे हे राहत होते. ते मुळचे सांगली जिल्ह्याचे रहिवाशी होते. ते बी. फार्म. पदवीधर होते. ते व्ही-एन्शुअर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ११ लाख ९४ हजार ९७८ रुपये होते. २१ जून २०२४ रोजी संतोष तायगडे हे गावी गेले होते.

तिथे तारमुळे गावाहून ज्योतिबा मंदिराकडे मोटारसायकलवर जात असताना, सांगली जिल्ह्यातील मांगळे फाटा चौकाजवळ मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कारचालकाविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अपघाताप्रकरणी संतोष उत्तम तायगडे यांच्या पत्नी प्रियांका संतोष तायगडे, अल्पवयीन मुलगी तसेच वयोवृद्ध आई-वडील यांनी ठाणे मोटार अपघात न्यायालयात दावा दाखल केला होता. ठाणे येथे शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीतील हा दावा निकाली काढण्यात आला. न्यायधीश अद्वैत सेठना, मंजुषा देशपांडे, ठाणे प्रमुख जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. बी. अग्रवाल आणि ठाणे न्यायालयातील इतर न्यायाधीशांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. या प्रकरणी दावेदारांचे प्रतिनिधित्व ॲड. समीर देशपांडे यांनी केले, तर टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीतर्फे ॲड. अरविंद तिवारी यांनी काम पाहिले.

अखेर दोन्ही बाजूंच्या परस्पर सहमतीनंतर १ कोटी ५ लाख रुपये इतक्या एकरकमी रकमेवर तडजोड झाली. हा दावा निकाली काढण्यात आल्याने मृत दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना १ कोटी ५ लाख रुपये इतकी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीत झालेल्या या निकालामुळे तायगडे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. ही तडजोड ठाणे येथील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये गुरुवारी झालेली सर्वात मोठी दावा तडजोड ठरली.