ठाणे : मामे बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर त्याच्या भावजीने चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटातील अवयव देखील बाहेर पडले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तरुणावर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुरज शिंदे (१९) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर त्याचे भावजी अजय धोत्रे हे फरार असून कळवा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कळवा येथील महात्मा फुले नगर भागात सुरज शिंदे हा त्याचे आई-वडिल, भाऊ आणि बहिणींसोबत राहतो. याच भागात त्याची मामे बहिण स्वप्नाली ही तिचे पती अजय धोत्रे याच्यासोबत एका घरामध्ये भाडेतत्त्वावर राहते. अजय हा स्वप्नाली हिला विविध कारणांवरून मारहाण करत असे. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेहमी वाद होत असे.

रविवारी मध्यरात्री अजय याने स्वप्नाली हिस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरज याने पाहिल्यानंतर तो अजय यांना समजाविण्याचा प्रयत्न करु लागला. अजय हा स्वप्नाली हिला मारहाण करण्याचा प्रयत्न करत असल्याने सुरज तिचा अजयपासून बचाव करत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या अजय याने सुरज याला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

सुरज याला मारहाण होत असल्याने त्याची आई आणि १२ वर्षांची बहिण त्याला वाचविण्यास गेले. त्यावेळी अजय याच्या हातामध्ये धारदार चाकू होता. त्याने सुरज याच्या पोटावर चाकूने वार केला. हा हल्ला इतका भयानक होता की, त्याच्या पोटातील आतड्या आणि इतर अवजय बाहेर पडू लागले होते. त्यानंतर सुरजची आई आणि त्याच्या बहिणीने अजय याच्या हातातील चाकू खेचण्याचा प्रयत्न केल्याने अजय याच्या हातातील चाकू खाली पडला. सुरज हा गंभीर जखमी झाल्याने त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेनंतर अजयने तेथून पळ काढला होता.

या घटनेत सुरज याच्या बहिणीच्या हाताला देखील दुखापत झाली आहे.सुरज याच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे अजय विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अजय याचा शोध घेत आहेत. अजय याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १०९ (१), आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.