Manoj Jarange Patil Mumbai Protest : ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ठाणे, मुंबई तसेच नवी मुंबईतील मराठा बांधव पुढे सरसावला असतानाच, आता ‘एक भाकरी कृतज्ञतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात हातभार लावण्यासाठी सकल मराठा समाज, जुन्नर तालुका तसेच सर्व मराठा समाजाला आवाहन करण्यात येत आहे. समाजमाध्यमावर याचे पोस्ट प्रसारित करण्यात आले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. यात मराठवाडा आणि विदर्भ मधील मराठा आंदोलकांचा सहभाग सर्वात जास्त आहे. या भागातील मराठा बांधव हे मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मराठा मंडळाच्या सभागृहात महत्वाची बैठक पार पडली होती. यात आंदोलनासाठी येणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांच्या भोजन, पाणी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच समाजातील अनेक नेत्यांकडून मागील काही दिवसांपासून विभागनिहाय बैठका घेऊन अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. ठाणेकर मराठा समाजही यात मागे राहू नये म्हणून एकदिलाने पुढे सरसावत आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ठाणे शहरातून आणि नाशिकमार्गे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी आनंदनगर चेक नाका येथे नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली होती. ती व्यवस्था आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही कायम आहे. तसेच मुंबईतील आझाद मैदान याठिकाणी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा समाजाबरोबर उपोषण करत आहेत. हे बांधव उपाशीपोटी राहू नये यासाठी ठाण्याच्या घराघरातून चटणी, भाजी, भाकर तर, कल्याणमधील मराठा समाजाने मुंबईत अन्नछत्र सुरू केले आहे. याबरोबरच आता आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी जुन्नर तालुक्यातील सकल मराठा समाज तसेच सर्व मराठा समाजाला प्रत्येक घरातून चपाटी, भाकरी, शेंगदाणा किंवा लसूण चटणी जेवढी शक्य होईल तेवढी द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
समाजमाध्यमाच्या मार्फत आवाहन
आंदोलनकर्ते उपाशी राहू नये यासाठी प्रत्येक घरातून भाकरी /चपाटी आणि चटणी द्यावी असे आवाहन समाजमाध्यमाद्वारे केले जात आहे. या पोस्टरमध्ये भाकरी /चपाटी रुमालात किंवा उपरणामध्ये व्यवस्थित बांधून द्यावी जेणेकरुन ती सुरक्षित मराठा बांधवापर्यंत पोहोचविता येईल, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.