ठाणे : वडाळा ते गायमुख मेट्रो प्रकल्पातील चार स्थानकादरम्यानच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी आठ दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. या चाचणीदरम्यान, शिंदेची शिवसेना आणि भाजपने घोडबंदर मार्गांवर बॅनरबाजी केली होती. आठ दिवस उलटून गेल्यानंतरही कायम असलेले बॅनर गेल्या दोन दिवसातील पावसादरम्यान, रस्त्यांवर पडले आहेत. या बॅनरमुळे अपघातांची भिती व्यक्त होत आहे.

ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवरील भार कमी व्हावा, या उद्देशातून मेट्रो प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील शहरे एकमेकांना जोडण्यात येत आहे. त्यामध्ये मेट्रो मार्ग ४ (वडाळा–कासारवडवली) आणि ४ अ (कासारवडवली–गायमुख) या मेट्रो प्रकल्पांची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.

ठाणे महापालिका निवडणुकीपुर्वी किमान चार स्थानकांवर मेट्रोची सेवा सुरू करण्याचा बेत सत्ताधारी महायुतीकडून आखला जात आहे. संपुर्ण प्रकल्पासाठी दोन वर्ष लागणार असणार तरी, घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव कासारवडवली, विजय गार्डन या चार स्थानकांवर मेट्रो सेवा या वर्षाअखेर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रकल्पातील चार स्थानकादरम्यानच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी आठ दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती.

मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे. प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अपूर्ण असून नागरिकांचा त्रास कायम आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता. ही खरी चाचणी नाही, तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ आहे, असा आरोप काँग्रेसनेही केला होता.

या मेट्रो चाचणीच्या निमित्ताने शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी घोडबंदर मार्गावर बॅनर लावले होते. घोडबंदर येथील गायमुख ते कापुरबावडीपर्यंतच्या मेट्रो मार्गिकेच्या खांबांवर हे बॅनर लावण्यात आलेले होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हे बॅनर लावून वातावरण निर्मीती केली होती. या ठिकाणी पक्षाचे झेंडेही लावण्यात आले होेते. कार्यक्रमानंतर हे बॅनर काढण्यात आलेले नव्हते. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

यादरम्यान, अनेक बॅनर तुटून खाली पडले. त्याच्या लाकडी पट्ट्या आणि बॅनर रस्त्यांवर पडल्या आहेत. काही ठिकाणी बॅनर अर्धवट तुटून लटत आहेत. या बॅनरमुळे अपघातांची भिती व्यक्त होत आहे.