ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील म्हातार्डी येथील स्थानक हे केवळ हायस्पीड रेल्वेचा थांबा नसून, एकात्मिक वाहतूक केंद्र (Integrated Transport Hub) म्हणून विकसित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात येते आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत म्हातार्डी बुलेट ट्रेन स्थानकाला ठाणे आणि कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रो स्थानक यांच्याशी जोडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महारेल (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation – MahaRail) तर्फे या प्रस्तावाचे सविस्तर आरेखन आणि संकल्पचित्र सादर करण्यात आले.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या उभारणीचे काम सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात वेगाने सुरू असल्याचे दिसते आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकल्पातील एका बोगद्याच्या कामाची पाहणी रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील बुलेट ट्रेनचे स्थानक दिवा जवळ म्हातार्डी येथे होणार आहे. त्यामुळे म्हातार्डी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी वेगाने सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. सध्या या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग नाही. रस्ते मार्ग प्रशस्त नाहीत. दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान हे स्थानक असणार आहे. त्यामुळे येथे पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था उभारण्याचे प्राधान्य सध्या सरकारचे आहे.

याच पार्श्वभूमीवर नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली. यावेळी म्हातार्डी बुलेट स्थानक एकात्मिक वाहतूक केंद्र म्हणून विकसीत करण्यावर चर्चा झाली. यासाठी आराखडा सादर करण्या आला. या आराखड्यातून म्हातार्डी स्थानकातून प्रवाशांना थेट ठाणे, कोपर आणि नवी मुंबईतील तळोजा मेट्रो स्थानकांपर्यंत सहज व जलद पोहोचता यावे, यासाठी विविध पर्याय मांडण्यात आले. यात सुलभ रस्ते जाळे, सार्वजनिक वाहतूक सुविधा, तसेच मेट्रो आणि रेल्वे जोडणी अशा बहुआयामी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी हायस्पीड रेल्वे प्राधिकरणास हा प्रस्ताव सकारात्मकपणे तपासून रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. हायस्पीड रेल्वे प्राधिकरण (NHSRCL) लवकरच याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रालयाला सादर करणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत जाण्यासाठी सुलभ व एकात्मिक प्रवासाचा अनुभव मिळेल. ठाणे जिल्ह्यात दिवाजवळ बांधण्यात येणारे म्हातार्डी स्थानक हे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन ठरणार असून, पुढील काळात हे ठिकाण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचे केंद्रबिंदू बनेल. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल आणि हायस्पीड रेल्वे प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.