ठाणे : घोडबंदर घाट भागात रस्ते दुरुस्तीकामांमुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर दररोज वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. नागरिकांच्या प्रवासाचा वेळ देखील वाढत आहे. त्यातच आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीच महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आपल्या ताफ्यासह विरुद्ध दिशेने प्रवास केल्याचे कळते आहे. या घटनेची चित्रफीत आता समाजमाध्यमांवर प्रसारित होऊ लागली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

घोडबंदर घाट मार्गावरून जेएनपीए बंदरातून सुटणारी अवजड वाहने गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतुक होत असते. तर वसई-विरार, मिरा भाईंदर भागातील हजारो नोकरदार, व्यवसायिक ठाणे, नवी मुंबई, भिवंडीच्या दिशेने प्रवास करतात. घोडबंदर येथील गायमुख घाटाजवळील पेट्रोल पंप भागात घाट मार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपासून मिरा भाईंदर महापालिकेकडून सुरु होते. या दुरुस्तीच्या कामामुळे येथील वाहने टप्प्या-टप्प्याने एक मार्गिकेवरून सोडली जात होती. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसू लागला होता. हे काम पूर्ण झाले असले तरी मागील चार दिवसांत पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागला होता.

व्हिडीओ व्हायरल

घोडबंदर घाट भागात रस्ते दुरुस्तीकामांमुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर दररोज वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. नागरिकांच्या प्रवासाचा वेळ देखील वाढत आहे. त्यातच आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीच महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आपल्या ताफ्यासह विरुद्ध दिशेने प्रवास केल्याचे कळते आहे. हा प्रवास मुंबई अहमदाबाद मार्गावरील असल्याचे कळते आहे. तसेच वाहतुक कोंडीमुळे ताफा अडकला होता. त्याचा परिणाम समोरुन, योग्य दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांनाही सहन करावा लागला. वाहनांच्या अक्षरश: रांगा लागल्या असतानाही मंत्र्यांचा ताफा सर्रास विरुद्ध दिशेने वाहतुक करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.