thane news : ठाणे : ठाण्यातील एका नामांकित शाळेतील तीन वर्षांच्या विद्यार्थीनीवर विनयभंग झाल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला. परंतु ठोस पुरावा आढळून आला नाही. दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई शहरात संबंधित मुलगी राहते. ती ठाण्यातील एका नामांकित शाळेत शिकते. काही दिवसांपूर्वी मुलीने तिच्या आईला विनयभंगाची माहिती दिली होती. यानंतर तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाण्यातील असल्याने झिरो एफआयआरनुसार, हे प्रकरण वर्तकनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले.
या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु होता. परंतु पोलिसांना घटनेचे ठोस पुरावे सापडले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला का, याबाबत शासंकता असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर मनविसे आक्रमक झाली आहे. मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाला निवेदन दिले आहे.
बदलापूरची पुनरावृत्ती होऊ नये
मनसेने त्यांच्या निवदेनात बदलापूरची पुनरावृत्त होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पोलिसांकडे केली. संबंधित आरोपीला तात्काळ अटक होणे आवश्यक आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याचे आदेश द्यावेत. तसेच शाळेतील शिक्षक, कर्मचारी, सर्वांची चारित्र्य पडताळणी झाली आहे का? नसल्यास निष्काळजीपणा करणाऱ्या शाळा प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे.
१५ दिवसांपूर्वी पाच शाळकरी मुलींचा विनयभंग
१५ दिवसांपूर्वीच वर्तकनगर येथील एका शाळेतील पाच शाळकरी मुलींचा विनयभंग झाला होता. या विद्यार्थीनी १६ ते १७ वयोगटातील होत्या. या प्रकरणी विनयभंग करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. परंतु पुन्हा घटना घडल्याने विद्यार्थ्यीनींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.