Mumbai Nashik Highway: ठाणे : मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरील प्रवास वेगवान व्हावा यासाठी मुंबई महामार्गावरील माजिवडा ते वडपे या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरु आहे. परंतु कंत्राटदाराकडून बेजबाबदारपणे सुरु असलेली कामांचा धोका वाहन चालकांच्या आणि प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी दुरुस्ती कामे सुरु आहे. तेथे सुरक्षा साधणे, लुकलुकणारे दिवे, धोकापट्टी बांधण्यात आली नाही. त्यामुळे एखादा गंभीर अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वांत महत्त्वाच्या महामार्गापैकी मुंबई नाशिक महामार्ग आहे. नाशिक, गुजरात आणि उरण येथील जेएनपीए बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहनाने या महामार्गावरुन वाहतुक करतात. तसेच कल्याण, भिवंडी येथून हजारो वाहन चालक याच महामार्गाने नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यात प्रवेश करतात. काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग देखील याच महामार्गाला जोडल्याने आता समृद्धी महामार्गाच्या वाहनांचा भार देखील मुंबई नाशिक महामार्गावर वाढू लागला आहे.

महामार्गावर दिवस-रात्र सुरु असलेली वाहतुक आणि समृद्धी महामार्गाचा वाढ वाढल्याने भविष्यातील कोंडी टाळण्यासाठी २०२१ पासून एमएसआरडीसीकडून या महामार्गावरील वडपे ते माजिवडा या भागाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु महामार्गावर कंत्राटदारांकडून बेजबाबदारपणे कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी मुख्य रस्ता आणि नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता यामध्ये काही फूट अंतर निर्माण झाले असून रस्ता असमान झालेला आहे. तर काही ठिकाणी खड्डे खोदले आहेत. तेथे केवळ तात्पुरत्या स्वरुपातील सुरक्षा साधने बसिवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी माती, राडारोडा रस्त्याच्या मध्ये पडलेला दिसतो. एखादे भरधाव वाहन येथून गेल्यास मोठी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ज्याठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरु आहेत. तेथे विद्युत पुरवठा देखली नसतो. त्यामुळे रात्री वाहन चालविताना फक्त वाहनांतील दिव्यांच्या उजेडावर वाहन चालवावे लागते. भरधाव वाहन आल्यास ते दिसत देखील नाही. दुचाकी चालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. माजिवडा, साकेत, खारेगाव परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही स्थिती आहे.

मुंबई नाशिक महामार्गाने दुचाकीने प्रवास करताना एकीकडे अवजड वाहने आणि दुसरीकडे वाईट रस्ते अशा दोन्हीचा सामना करावा लागतो. प्रशासनाकडून अनेक ठिकाणी सुरक्षा साधने बसविली नसल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. राहुल करपे, प्रवासी.

ज्या ठिकाणी कामे सुरु आहेत तेथे सुरक्षा साधने बसविण्यात आली होती. सुरक्षा साधने निघाली असतील तर तात्काळ ती बसविली जातील. रमेश खिस्ते, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी.