पोलिसांच्या नेमणुकीबरोबरच सीसीटिव्ही यंत्रणा करणार कार्यान्वित

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे प्रवाशांना होणारा त्रास होण्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून त्याची गंभीर दखल घेत अशा रिक्षाचालकांवर संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला. तसेच या परिसरात यापुढे वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रिक्षावाल्यांच्या मुजोरीला चाप बसविण्यासाठी पोलीसांची नेमणूक करण्यात येणार असून त्याचबरोबर या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>शहरांच्या विकासाबरोबरच रस्ते जोडणी गरजेची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातील रस्ते आणि पदपथांवर फेरिवाले ठाण मांडून बसत असल्याच्या तक्रारी येऊ लागताच आयुक्त अभिजीत बांगर यांनी या परिसराचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिकेच्या पथकाकडून रेल्वेस्थानकाबाहेरील १५० मीटर परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी या भागातील बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रेल्वे स्थानकामधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हाताला धरून रिक्षामध्ये ओढत नेणे, अपेक्षित भाडे मिळेपर्यत आडमुठी भूमिका घेवून रिक्षा रस्त्यात लावून ठेवणे, भाडे नाकारणे, बेशिस्तपणे रिक्षा उभी करणे, अनधिकृत रिक्षांचा वावर, महिला प्रवाशांना त्रास देणे, महिला रिक्षा चालकांना अन्य रिक्षा चालकांकडून होणारा त्रास, रेल्वेच्या हद्दीत उभे राहून प्रवाशांचा भाड्यासाठी पाठलाग करणे अशा स्वरूपातील तक्रारी आयुक्त अभिजीत बांगर यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त बांगर यांनी पोलिस प्रशासनासोबत शुक्रवारी बैठक घेतली. बैठकीस वाहूतक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे, महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे हे उपस्थित होते. या बैठकीत ठाणे स्थानकाबाहेरील बेशिस्त रिक्षाचालकांवर पालिका आणि पोलिसांमार्फत संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांनी दिला ठाकरेंना धक्का; नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश

ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज पाच लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. महिला व मुली यांच्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात सुरक्षिततेचे वातावरण असावे या दृष्टीने उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. रेल्वे परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळावा, यासाठी रिक्षांच्या परिचालनात शिस्त असावी. याबाबत बैठकीत नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली. गेल्या वर्षभरात पाचशेहून अधिक बेशिस्त रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर ही परिस्थिती बदललेली नसल्याचे पोलीसांकडून बैठकीत सांगण्यात आले. तर, यापुढे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांची नियुक्ती विशेष स्वरूपात करण्यात येईल. त्यातून भाडे नाकारणारा रिक्षा चालक, बेशिस्तपणे पार्किंग करणारा रिक्षाचालक आणि अनधिकृत रिक्षा चालक यांच्यावर कारवाई करणे, ज्या रिक्षा विनापरवाना चालवल्या जात आहेत, त्या जप्त केल्या जातील, या कामात ठाणे महापालिकाही पोलिसांना सहकार्य करेल, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिले. या परिसरात वातानुकूलित टँक्सी थांबा असून तो त्याच ठिकाणी दुसऱ्या लेन मध्ये सुरू केला तर खाजगी वाहनांना जाण्यासाठी जी मार्गिका आहे ती खुली होईल, तसेच या परिसरात अधिकच्या विद्युत दिव्यांची गरज असल्याचेही पोलिसांनी सांगितले. वातानुकूलित टॅक्सी थांबाबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित संघटनांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे आयुक्त बांगर यांनी दिले. तर सॅटिस पुलाखालील परिसरात भरपूर प्रकाश राहिल अशा पध्दतीने विद्युत दिवे लावण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाला यावेळी दिले. रिक्षावाल्यांच्या काही जुन्या संघटना असून त्या विधायक पध्दतीने व्यवसाय करतात, अशा संघटनांशी चर्चा करुन त्यांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण होईल. त्यांना व्यवसाय करण्यासाठी निर्धोक वातावरण निर्माण होईल याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात यापुढे वाहतूक कोंडीवर नियंत्रण, तसेच रिक्षावाल्यांच्या मुजोरीला चाप बसविण्यासाठी पोलीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा उपलब्ध करुन देवून त्याचे नियंत्रण हे नौपाडा पोलीस ठाण्यात असेल. या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच ठाणे स्टेशन परिसरात पोलीस कर्मचारी कामावर आहेत की नाही याचीही माहिती पोलीस विभागाला मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation and police jointly decided to take action against unruly rickshaw pullers amy
First published on: 06-02-2023 at 16:28 IST