ठाणे : महापालिकेच्या आस्थापनेवर आधीच दोन अतिरिक्त आयुक्त पदांना मंजुरी असतानाच, आता आणखी एक नवीन पद निर्माण करण्यास प्रशासकीय सभेने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासनात एकूण तीन अतिरिक्त आयुक्त कार्यरत राहणार आहेत. महापालिकेच्या वाढत्या कामकाजाचा आणि शहर विकासाच्या वेगाने वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर आधीच दोन अतिरिक्त आयुक्त पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यापैकी एका पदावर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि दुसऱ्या पदावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे कार्यरत आहेत. संदीप माळवी यांची अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नतीने निवड करण्यात आलेली आहे तर, रोडे हे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत.

अतिरिक्त आयुक्त पदावर हे दोन अधिकारी कार्यरत असले तरी, ठाणे महापालिकेच्या वाढत्या कामकाजाचा आणि लोकसंख्येच्या विस्ताराचा विचार करता प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी “अतिरिक्त आयुक्त” या संवर्गातील एक नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासंबंधीच्या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत मान्यता देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेचे वाढते कामकाज, महापालिका क्षेत्रातील वाढणारी लोकसंख्या, नविन प्रकल्प आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सुविधा पुरविण्याबाबतचे दायित्व याचा विचार करून, तसेच महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी आणि नियंत्रण यासाठी अतिरिक्त आयुक्त या संवर्गाचे एक पद नव्याने निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ही या पदाची निर्मीती करण्यात येत असल्याचे पालिकेने प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्त या संवर्गासाठी एक पद नव्याने निर्माण करण्यासाठी महापालिकेचा ठराव आवश्यक आहे. त्यामुळे या प्रस्तावास प्रशासकीय सभेने नुकतीच मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होऊन शहर विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.