ठाणे : शहरात प्राणवायुचे प्रमाण वाढावे आणि नागरिकांना मनोरंजन आणि विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने हिरानंदानी मेडोज परिसरात ‘ऑक्सिजन पार्क’ ची निर्मिती केली आहे. या उद्यानात विविध प्रजाचीची एक हजार झाडांची लागवड, ७५ वर्ष जुन्या वड आणि पिंपळ झाडांचे जतन आणि शंभरहून अधिक औषधी वनस्पतीची उद्यानात लागवड करण्यात आली आहे.
उद्यानात चालण्यासाठी मार्गिका, योगा आणि व्यायाम करण्यासाठी व्यवस्था, बांबू पथ, छोट्या तलाव सौदर्यीकरण, अशी कामे करण्यात आलेली असून दिवाळीच्या कालावधीत या उद्यानाचे लोकार्पण करण्याची तयारी पालिकेकडून सुरू आहे.
ठाणे येथील पोखरण क्रमांक दोन भागातील हिरानंदानी मेडोज परिसरात पालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात केवळ झाडांची लावगड करण्यात आलेली होती. त्याव्यतिरिक्त कोणत्याही सुविधा उद्यानात उपलब्ध नव्हत्या. यामुळे या उद्यानाचा फारसा वापर होत नव्हता. सुमारे साडे तीन एकर जागेत हे उद्यान आहे.
ठाणे महापालिकेने या उद्यानाचे नुकतेच नुतनीकरण केले असून त्यात येथे ‘ऑक्सिजन पार्क’ ची निर्मिती केली आहे. या उद्यानाला राजमाता जिजाऊ ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव देण्यात आले आहे. तशी कमानही उद्यानाच्या ठिकाणी उभारण्यात येत आहे. या उद्यानात विविध प्रजाचीची एक हजार झाडांची लावगड केली असून त्याचबरोबर ७५ वर्ष जुन्या वड आणि पिंपळ झाडांचे जतन करण्यात आलेले आहे.
संपूर्ण उद्यान फुलझाडांनी, औषधी वनस्पतींनी आणि हिरवाईने नटलेले असेल. बांबू, तुळस, नीम, आवळा, अशोक यांसारख्या अनेक झाडांची लागवड याठिकाणी करण्यात आली आहे. या झाडांमुळे परिसरातील हवामान अधिक शुद्ध होईल आणि नागरिकांना सकाळ आणि संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी एक शुद्ध वातावरण मिळेल. तसेच झाडांखाली सावलीदार जागा, तसेच लहानसा तलाव तयार करण्यात आला असून त्याठिकाणी जलचर प्राणी ठेवण्यात येणार आहेत.
या उद्यानात सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नागरिकांना फेर फटका मारता यावा यासाठी ५०० मीटरचा पथ तयार करण्यात आला आहे. या पथावर प्रत्येक ठिकाणी अंतर नमूद करण्यात आले आहे, यामुळे नागरिकांना किती अंतर पार केले, हे समजू शकणार आहे. याठिकाणी नागरिकांना योगा आणि व्यायाम करता यावा, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून विद्युत दिवे कमी उंचीवर बसविण्यात आलेले आहेत. मार्गालगत बांबूची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे उद्यान विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली.
औषधी वनस्पतींची लागवड
गुडमार, अडुळसा, अननस, हळद, सिट्रोनेला, बासमती- अन्नपुर्णा गवत, वाळा, जास्वंद, डिकेमाली, हिरवा चाफा, कापुर, बारतोंडी, अळीव, अंबाडा, कुंकू, नीरफणस, गोकर्ण, जायफळ, काळी मिरी, चंदन, दमवेल, धावडा, बिब्बा, शेंदरी, बिलिंबी, अंकोळ, आपटा, बेल, रुद्राक्ष, रायआवळा, पिवळा कांचन, शेर, करवंद, कृष्णकमळ, भद्राक्ष, मंदार-रुई, गुलाब, जांभूळ (पांढरा), निरगुडी, गुळवेल, पुदिना, हाडजोड, गुंज, केवडा, मुरूडशेंग, वेखंड, शतावरी, शिवन, अशा औषधी वनस्पतींची उद्यानात लागवड करण्यात आली आहे.
क्युआर कोड
उद्यानातील वृक्षांची माहीती देणारे फलक याठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या शिवाय, त्याठिकाणी क्युआर कोडही देण्यात आला आहे. तो स्कॅन केल्यानंतर त्या वृक्षाची संपुर्ण माहिती नागरिकांना मिळू शकणार आहे.