ठाणे : श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया शाळेतील २२ विद्यार्थी आणि ५ शिक्षकांना डेंग्युची लागण झाल्याची बाब ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालत उघड झाली आहे. विशेष म्हणजे चौकशी समिती शाळेच्या आवारात गेली होती, त्यावेळी त्यांना तिथे डासांचा प्रादर्भाव आढळून आला. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खणलेल्या खड्डयांमध्ये पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होत असल्याचे समितीला प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या चौकशी अहवालाच्या आधारे ठाणे महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ठाणे येथील चिरागनगर परिसरात श्रीमती सुनीतीदेवी सिंघानिया शाळा आहे. या शाळेच्या आसपास सुरू असलेल्या बांधकामांमुळे विद्यार्थांसह शिक्षकांना डेंग्युची लागण झाल्याचा आरोप पालकांनी केला होता. या संदर्भात लोकसत्ता ठाणे या सहदैनिकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. तसेच यासंदर्भात मनविसेचे सरचिटणीस संदिप पाचंगे यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, पालकांच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा करत ते फेटाळून लावणाऱ्या शाळा प्रशासनाने ऑनलाईन वर्ग भरविण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणाची ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे यांनी दखल घेत चौकशी समिती गठित केली होती. पालिका शिक्षण विभागातील सीआरसी समन्वयक नुतन बांदेकर, गटप्रमुख अनघा पालांडे, युआरसी समन्वयक रविंद्र पाटील आणि गटअधिकारी संगिता बामणे यांचा समावेश होता. या समितीने शाळेच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहाणी केली आणि त्यामध्ये निदर्शनास आलेल्या बाबींचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला.
या अहवालात मुख्यध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार २२ विद्यार्थी आणि ५ शिक्षकांना डेंग्युची लागण झालेली आहे, असे स्पष्ट म्हटले आहे. शाळेच्या परिसरातील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असून त्याकरीता त्वरीत उपाययोजना करण्यात यावी. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ४ जूनपासून सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या अनुपस्थितीच्या कारणासहीत यादी उपलब्ध करून द्यावी, असे सुचित केले होते. मात्र, त्यास योग्य प्रतिसाद देण्यात आलेला नाही, असे शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे.
समितीनी नोंदविलेली निरिक्षणे
इमारतीच्या आजुबाजुला नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खणलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे. इमारतींच्या तिन्ही बाजूला बांधकामादरम्यानचा राडारोडा आणि इतर अनावश्यक साहित्य पडलेले आहे. शाळेतील खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवलेल्या आहेत. परंतु त्या व्यवस्थित नसल्यामुळे डास वर्गात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्गाच्या वरच्या बाजूस वायुवीजनासाठी बसविण्यात आलेल्या तावदानांमध्ये असलेल्या फटींमुळे डास वर्गात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, त्या ठिकाणी डास प्रतिबंधक जाळया बसवलेल्या आढळून आलेल्या नाहीत. प्रत्येक वर्गामध्ये डास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक ‘ऑल आऊट’ चे छोटे यंत्र बसविलेले आहे. सद्यस्थितीत मुख्यध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार २२ विद्यार्थी आणि ५ शिक्षकांना डेंग्युची लागण झालेली आहे. इमारतींच्या व्हरांड्यात दोन डास, किटक झॅपर बसविलेले आढळून आले. भेटीदरम्यान शाळेच्या आवारात डासांचा प्रादुर्भाव दिसून आला, अशी निरीक्षणे अहवालात नोंदविण्यात आली आहे.
समितीने काढलेला निष्कर्ष
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खणलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होत आहे. शाळेतील खिडक्यांना बसविलेल्या जाळ्या व्यवस्थित नाहीत. तसेच वर्ग खोलीच्या आकारमानानुसार बसविलेले ‘ऑल आऊट’ चे छोटे यंत्र पुरेसे नाही. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांना डासांचा प्रादुर्भाव होत आहे. शाळेच्या जुन्या आणि नवीन इमारतीमधील व्हरांड्यामध्ये वायु विजनाची व्यवस्था आढळून आलेली नाही.