ठाणे : अतिक्रमण विरोधी कारवाईत अडथळे येऊ नयेत म्हणून ठाणे महापालिकेने एक आगळीवेगळी भन्नाट कल्पना राबवली असून कारवाई करणारे कर्मचारी चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणासाठी इतरत्र जाऊ नयेत यासाठी त्यांना कारवाईच्या ठिकाणीच चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम सोमवारी दिसून आले असून नागरिकांच्या विरोधानंतर दुपारी तीन वाजता कारवाई सुरू होऊनही आठपैकी दोन इमारती पालिकेला सायंकाळी ६ वाजेपर्यंत रिकाम्या करणे शक्य झाले, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामे उभी राहीली असून त्यापैकी काही प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बांधकामे उभी राहताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भुमीका घेणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनावर आता या इमारती जमीनदोस्त कारवाईची वेळ आली आहे. अशाचप्रकारे शिळ परिसरातील आणखी ११ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर पालिकेच्या पथकाने ११ पैकी ३ इमारती जमीनदोस्त केल्या होत्या. उर्वरित इमारतीत नागरिक राहत होते. त्यांनी कारवाईस विरोध केला होता. पावसाळा आणि सण उत्सवांमुळे पालिकेने ही कारवाई थांबविली होती. मात्र, दिवाळी संपताच पालिकेने सोमवारपासून उर्वरित आठ इमारतींवर कारवाई सुरू केली आहे.
बेकायदा इमारतीवर कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची पथके तैनात केली जातात. सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकाच जागेवर ताटकळत उभे रहावे लागते. तसेच कारवाईवेळी पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आणि त्यांनाही तेथून इतरत्र जाणे शक्य होत नाही. चहा, नाश्ता, पाणी आणि जेवण उपलब्ध होत नसल्यामुळे तसेच लघुशंकेची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे हाल होतात. त्याचबरोबर इमारतींवर कारवाई करणारे कर्मचारी चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणासाठी इतरत्र जातात. यामुळे कारवाई खोळंबते आणि एक दिवसाची कारवाई दोन दिवसांवर जाते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने एक भन्नाट कल्पना राबवली असून कारवाईच्या ठिकाणीच चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सोमवारी दुपारनंतर कारवाई अखंड सुरू राहिल्याने दोन इमारती रिकाम्या करणे पालिकेला शक्य झाले असून मंगळवारी दिवसभरात चार इमारती रिकाम्या करण्याचे उद्दीष्ट पालिकेने ठेवले होते. या इमारतींवर बुधवारपासून हातोडा मारला जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
अनेकदा कारवाईदरम्यान कर्मचारी चहा, नाश्ता किंवा जेवणासाठी बाहेर जात असल्याने कारवाई खोळंबते आणि एक दिवसाची कारवाई दोन दिवसांवर जाते. बंदोबस्तातील पोलीस आणि पालिकेचे अधिकारी दिवसभर उन्हात उभे राहून थकून जातात, पाणी व विश्रांतीचीही सोय नसते. त्यामुळे दिवा येथील कारवाईदरम्यान त्याच ठिकाणीच चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली. यामुळे दुपारी तीन सुरू झालेली कारवाई अखंड सुरू राहिली आणि दोन अनधिकृत इमारती पालिकेला रिकाम्या करता आल्या, अशी माहिती उपायुक्त (अतिक्रमण) उमेश बिरारी यांनी दिली.
