लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : विविध गुन्ह्यांना पायबंद बसावा यासाठी ठाणे शहरातील ९१७ ठिकाणी ३ हजारहून अधिक कॅमेरे ठाणे पोलिसांकडून बसविण्यात येणार असून त्यासाठी तीनशे किमीचे रस्ते खोदण्यास परवानगी देण्याची मागणी पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केली. परंतु रस्ते बांधणीची कामे नुकतीच करण्यात आलेली असल्यामुळे खोदकामाच्या परवानगीस नकार देत पालिका प्रशासनाने विद्युत खांबांवरून उन्नत किंवा पदपथाजवळील भागातून कॅमेऱ्यांच्या वाहिन्या टाकण्याचा पर्याय दिला आहे. पालिकेच्या भुमिकेमुळे ठाणे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.

ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची पथके, गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गस्ती घालत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे निरनिराळ्या गुन्ह्यांना पायबंद बसावा तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेता यावा, यासाठी ठाणे पोलिसांनी संपुर्ण आयुक्तालय क्षेत्रात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार संपुर्ण आयुक्तालयातील १ हजार ९९७ ठिकाणी ६ हजार ५१ इतके सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार करून तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता देत प्रकल्पासाठी ५७० कोटी ३० लाखांचा निधी मंजुर केला आहे. सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी पोलिस आयुक्त स्तरावर एकूण आठ बैठका घेण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-खालापूरच्या उच्चशिक्षित तरुणाला एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी करताना अटक, कल्याण रेल्वे सुरक्षा बळाची कामगिरी

ठाणे ते दिवा शहरात ३ हजार १६३, भिवंडी शहरात १,३४७ आणि उल्हासनगर ते बदलापूर १,५४१ असे एकूण ६ हजार ५१ सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यातील ठाणे शहरातील कॅमेऱ्यांच्या जोडणीसाठी वाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी शहरातील ३०० किमीचे रस्ते खोदण्यास परवानगी देण्याबाबत ठाणे पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मागणी केली. परंतु ठाणे शहरात कोट्यावधी रुपये खर्चून अनेक रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे करण्यात आली आहेत. नवेकोरे रस्ते खोदल्यास त्या रस्त्यांची दुरावस्था होऊ शकते. यामुळेच खोदकामाच्या परवानगीस नकार देत पालिका प्रशासनाने विद्युत खांबांवरून उन्नत किंवा पदपथाजवळील भागातून कॅमेऱ्यांच्या वाहिन्या टाकण्याचा पर्याय दिला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य

यामध्ये स्थिर कॅमेरे, ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे, लांबून तसेच अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे तर, वाहनांचा वेगाची नोंद करणारे आरएलव्हीडी कॅमेरे. अशा प्रकारचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांना नियंत्रण कक्षात बसून संपुर्ण शहरातील गुन्हेगारीवर तसेच वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

आणखी वाचा-‘वाचलेली पुस्तके आणा आणि तेवढीच आवडीची पुस्तके घेऊन जा, डोंबिवलीत पुस्तक अदान प्रदान उपक्रमात एक लाखाचे लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅमेऱ्यांच्या जोडणीसाठी नवेकोरे रस्ते खोदल्यास त्याची दुरावस्था होऊ शकते. त्यामुळे रस्ते खोदाईऐवजी कॅमेऱ्यांच्या जोडणीसाठी विद्युत खांबांवरून किंवा पदपथालगतच्या भागातून वाहिन्या टाकाव्यात, यासह इतर काही पर्याय पोलिसांना दिले आहेत. -प्रशांत सोनाग्रा, नगर अभियंता, ठाणे महापालिका