ठाणे – उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांच्या पाहणी अहवालावर आधारित, ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने १९ आणि २० जून रोजी एकूण ३३ अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत पूर्ण इमारती, प्लिंथ, कॉलम, स्लॅब तसेच विविध वाढीव बांधकामांचा समावेश होता.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार, प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकांना आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
या कारवाईत तळ अधिक चार मजले, सीआरझेड क्षेत्रात उभारलेले भंगाराचे गोदाम, व्याप्त अनधिकृत इमारतीवरील वाढीव बांधकाम, प्लिंथ, दुकानातील वाढीव बांधकाम आदी वेगवेगळ्या तक्रारींनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. १९ आणि २० जून रोजी झालेल्या या कारवाईत एकूण ३३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. ही कारवाई यानंतरही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याठिकाणी करण्यात आली कारवाई
•नौपाडा-कोपरी – ०२
•दिवा – १२
•मुंब्रा – ०३
•कळवा – ०४
•उथळसर – ०१
•माजिवडा-मानपाडा – ०५
•वर्तक नगर – ०२
•लोकमान्य नगर – ०२
•वागळे इस्टेट – ०२
एकूण – ३३