Thane Municipal Corporation : ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक उत्सव मंडळांकडून गणेशोत्सव तसेच नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. या मंडळांकडून उत्सवासाठी शहरातील रस्ते आणि पदपथांवर मंडप उभारण्यात येतो. त्यासाठी ठाणे महापालिका मंडळांकडून मंडप शुल्क घेते. मात्र, करोना काळापासून गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवांना मंडप भाडे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात येत असून ही परंपरा यंदाही पालिकेने कायम ठेवत मंडळांचे मंडप शुल्क माफ केले आहे.

करोना टाळेबंदी आणि सततच्या र्निबधांमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने वर्गणी गोळा करू नका, असे आदेश राज्य शासनाने दिले होते. यामुळे गणेश मंडळांपुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी गणेश मंडळांच्या मंडपाचे भाडे माफ करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने त्यावेळी घेतला होता. करोना काळानंतरही भाडे माफीची परंपरा आजही कायम असल्याचे चित्र आहे. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडपभाडे माफी द्यावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली होती.

ठाणे महापालिकेकडून मंडप भाडे आकारण्यात येत असल्याचे समजते. गणेशोत्सवाची परंपरा टिकून रहावी यासाठी मंडळानी करोना काळात साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. या कालावधीमध्ये त्यांना आर्थिक मदत देखील फारशी मिळालेली नाही. सर्व सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ते काम करीत असतात. यातूनच भावी पिढी घडण्यास मदत होत आहे. त्यामुळे त्यांना यंदाही संपूर्णत: मंडपभाडे माफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडपभाडे माफी द्यावी, अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी शहरात गणेशोत्सव साजरा केला जातो. ही सर्व मंडळे वर्षभर समाजोपयोगी अशी कामे करीत असतात. तसेच शहरामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीमध्ये देखील सर्व मंडळांचे पदाधिकारी आणि सदस्य हिरीरीने सहभाग घेवून हातभार लावत असतात. मागील दोन ते तीन वर्षापासून करोना, अतिवृष्टी या कारणांमुळे या मंडळांची आर्थिक परिस्थिती सक्षम राहिलेली नाही. ही मंडळे सामाजिक बांधिलकी व समाजप्रबोधनाच्या उदात्त हेतूने आणि महापालिकेने वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन करुन उत्सव साजरे करत असतात, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

आर्थिक दिलासा द्यावा

दरवर्षी असंख्य गणेश मंडळे आणि नवरात्रोत्सव मंडळे आपापल्या परिसरात उत्साहात, भक्तिभावाने आणि प्रेमाने हा सोहळा साजरा करतात. ही मंडळे फक्त उत्सवापुरती मर्यादित नसतात, तर वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम, समाजसेवा, रक्तदान शिबिरे, पर्यावरण जनजागृती आणि नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित करत असतात. या मंडळांचा सहभाग महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्येही मोलाचा असतो. ही मंडळे ज्या मर्यादित निधीतून इतका मोठा उत्सव साजरा करतात, त्यामागे प्रचंड मेहनत, वेळ आणि नागरिकांच्या वर्गणीच्या रूपात मिळालेला थोडासा निधी असतो. पण त्या निधीतूनच मंडप भाडे, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा आणि इतर खर्च भागवणं अनेकदा कठीण जातं. म्हणूनच ज्या मंडळांनी वर्षभर समाजासाठी योगदान दिले, त्यांना महापालिकेनेही आर्थिक दिलासा द्यावा, असे खासदार म्हस्के यांनी पालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले होते.

भाडेमाफीचा निर्णय

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. तर नवरात्रोत्सवाला धार्मिक महत्व आहे. गणेशोत्सवाच्या माध्यामातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जनजागृतीचे मोठे कार्य करत असतात. राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी द्यावी तसेच त्यासाठी कोणतेही मंडप भाडे आकारले जाऊ नये, असेही म्हस्के यांनी म्हटले होते. त्यांची मागणी मान्य करत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी भाडेमाफीचा निर्णय घेतला असून यासंबंधीचे परिपत्रक अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी काढले आहे.