ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमधील भाजप आणि शिंदेची शिवसेना या मित्र पक्षातील नेत्यांमध्ये वाक युद्ध रंगले असतानाच, दोन दिवसांपुर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्याच्या महापौर भाजपाचा व्हावा, असे मत व्यक्त केले होते. त्यापाठोपाठ आता भाजपने ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागातील इच्छूकांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले असून गुरूवारी होणाऱ्या या शिबीराच्या माध्यमातून भाजपने एकप्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे महापालिकेची निवडणुक येत्या काही महिन्यात होणार आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यातूनच प्रभागात ताकद असलेल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची मालिका सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात शिवसेनेचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत यश संपादन करत तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते.
राज्यात भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांची महायुती सत्तेवर आहे. या तिन्ही पक्षाचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे बोलत आहेत. प्रत्यक्षात मात्र ठाणे जिल्ह्यात शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. असे असतानाच, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी गुरूवारी ठाणे विभागीय कार्यालयात एका शिबीराचे आयोजन केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण ३३ प्रभागातील इच्छूक उमेदवारांना या शिबीरात मार्गदर्शन करण्यात येणार असून या शिबीरात आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप लेले हे निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. इच्छूकांचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत. यानिमित्ताने भाजपने एकप्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महापौर पदावरून वाक युद्ध
ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील भाजप आणि शिंदेची शिवसेना या पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाही तर, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे गणेश नाईकांच्या टिकेला प्रतिउत्तर देत आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक युद्ध रंगले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार याविषयी वेगवेळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी निवडणुकीबाबत मोठे विधान केले होते. ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हिच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमचीही हीच भुमिका कायम राहीली आहे, असे मत केळकर यांनी व्यक्त केले होते. तर, जनता ठरवेल महापौर कुणाचा असे प्रत्युत्तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले होते.