ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनाने सुरू केली असून महापालिकेने तयार केलेला प्रभागनिहाय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. या अहवालावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. अहवालात कोणते प्रभाग आरक्षित करण्यात आलेले आहेत याविषयी माहिती मिळू शकली नसली तरी, २०११ च्या जनगणनेनुसार २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना यापुर्वीच करण्यात आल्यामुळे प्रभाग रचनेप्रमाणेच आरक्षणांमध्ये बदल होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली असून, त्यानंतर येथे प्रशासकीय राजवट लागू आहे. महापालिकेची निवडणुक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी पालिकेने काही दिवसांपुर्वी प्रभाग रचना जाहीर केली होती. ही प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीवर तयार करण्यात आहे. यामुळे २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागसंख्या किंवा नगरसेवक संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकूण ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक निवडून आले होते. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे आणि एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम राहणार आहे. चार सदस्यांच्या प्रभागात साधारण ५० ते ६२ हजार लोकसंख्या, तर तीन सदस्यांच्या प्रभागात ३८ हजार लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. त्याआधारे २०१७ मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती. जनगनणा झालेली नसल्यामुळे यंदाही २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग तयार करण्यात आली आहे. त्यामुळे २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यांचा एक प्रभाग अशीच रचना यंदाही ठेवण्यात आली आहे. चार सदस्यांच्या प्रभागात साधारण ५० ते ६२ हजार लोकसंख्या, तर तीन सदस्यांच्या प्रभागात ३८ हजार लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पालिकेने आता प्रभागनिहाय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. या अहवालानुसार, अनुसूचित जातींसाठी (एसी) नऊ जागा, अनुसूचित जमातींसाठी (एसटी) तीन जागा आणि ओबीसी समाजासाठी २७ टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच, महिलांसाठी एकूण ६६ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
अंतिम मतदार यादी १२ डिसेंबरला
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २३ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही प्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाली असून, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राथमिक मतदारयादी जाहीर करण्यात येईल. आक्षेप व सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२५ असून, अंतिम मतदार यादी ६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर मतदान केंद्रांची यादी ८ डिसेंबर २०२५, व केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होईल.
