ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत महायुतीने ठाणे जिल्ह्यात घवघवीत यश मिळविले असले तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये कमालीची नाराजी पहायला मिळत आहे. विशेषत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकला चलोचा नारा दिल्यानंतर आता अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वबळावळावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.

महापालिका निवडणूकीत २० वर्ष त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे ओझे घेऊन आम्हाला सामोरे जायचे नाही असा दावा करत अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी आमची लढाई भाजप आणि शिवसेनेविरोधात असल्याचे म्हटले. ठाण्यात शिवसेनेचे (शिंदे गट) बळ अधिक आहे. भाजप आणि अजित पवार गटाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता ठाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे चित्र आहे.

राज्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे कायम राहिले. परंतु आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगसेवक नजीब मुल्ला यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांना पाठिंबा दिला. महायुती असल्याने राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट या पक्षांसह महायुतीतील इतर घटक पक्षाने एकत्र निवडणूक लढविली होती. ठाणे जिल्ह्यात शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे बळ वाढले आहे.

ठाण्यात भाजपचे शिंदे सेनेला आव्हान

ठाणे महापालिकेत एकूण ३३ प्रभाग असून त्यातून १३१ नगरसेवक निवडून जाणार आहेत. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत भाजपाने एकूण २३ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत असून या कार्यकर्त्यांनी १३१ पैकी ७० जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. यातूनच शिबिरामध्ये आपकी बार सत्तर पार अशी घोषणा देण्यात आली आहे.

शिंदे सेनेचीही स्वबाळाची तयारी- ठाण्यातील आनंद आश्रम येथे नुकतीच शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीमधील भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला. ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी व्यक्त केल्या. अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी बैठकीत केली.

त्यांच्या भ्रष्टाचाराचे ओो घेऊन आम्ही सामोरे जाणार नाही…- अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना एक प्रतिक्रिया दिली. महिन्याभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांची भेट घेऊन ठाणे, भिवंडीसह इतर महापालिकेत आम्हाला स्वबळावरच निवडणूक लढवायचे आहे असे सांगितले आहे. महापालिका निवडणूकीत २० वर्ष त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे ओझे घेऊन आम्हाला सामोरे जायचे नाही. महापालिकेत नवे ठाणे-जुने ठाणे अनेक विकास प्रकल्पात आम्ही भ्रष्टाचार काढला आहे. त्यामुळे आम्ही स्वबळाचा नारा दिला.

परंतु नेत्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल. आमच्यासोबत माजी नगरसेवक आहेत. आम्ही शिवसेना आणि भाजपविरोधात निवडणूका लढविणार असून तशी पावले देखील आम्ही उचलली आहेत, असे नजीब मुल्ला म्हणाले. आमची एक विचारसरणी, दूरदृष्टीकोन आहे. मुंब्रा, कळवा येथील नागरिकांचेही स्वबळावर निवडणूक लढवा असे म्हणणे आहे. ठाण्यात महापौर कोणाचा बसेल यासाठी आम्ही निर्णायक ठरणार आहोत. ठाणे शहरात फक्त महायुतीचे नगरसेवक आहेत. आम्ही कमीत कमी २५ नगरसेवक निवडून आणू असा दावाही त्यांनी केला.