ठाणे : ठाणे शहरातील १९२ सार्वजनिक उत्सव मंडळांनी नवरात्रौत्सवाच्या मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत. हा उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी १९२ पैकी जेमतेम २४ मंडळांना पालिकेने परवानगी दिली आहे तर, १६८ मंडळे मंडप परवानगीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते अडवून उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू झाली आहे. काही मंडळे संपुर्ण रस्ताच अडवित असल्याने वाहतूकीसाठी रस्ते बंद होत होते तर, काही ठिकाणी मंडपांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. याविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने अशा मंडप उभारणीची परवानगी देताना काही मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. त्याआधारे ठाणे महापालिकेने मंडप उभारणीची नियमावली तयार केली असून त्यानुसार पालिका प्रशासन मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देते.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक उत्सव मंडळांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी विविध विभागांकडे खेटे घालावे लागत होते. यामुळे मंडळांकडून नाराजीची सुर उमटत होता. त्यामुळे पालिकेने मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करत मंडळांना ऑनलाईन आणि थेट पालिकेत अर्ज करण्याची सुविधा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिली आहे. यंदाही ही सुविधा कायम आहे. आतापर्यंत ठाणे महापालिकेकडे १९२ मंडळांनी नवरात्रौत्सव मंडपासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी २४ मंडळांना पालिकेने परवानगी दिली आहे.

ऑनलाईन अर्जांना प्रतिसाद कमी

सार्वजनिक उत्सव मंडळांना पालिकेत येऊन अर्ज दाखल करावे लागू नयेत आणि त्यांना घरबसल्या अर्ज करता यावा यासाठी ठाणे महापालिकेने ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पालिकेकडे दाखल झालेल्या १९२ अर्जांपैकी केवळ ५२ अर्ज ऑनलाईनद्वारे करण्यात आले आहेत तर, १४० अर्ज थेट पालिकेकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या सुविधेस मंडळांचा प्रतिसाद कमी मिळताना दिसून येत आहे.

विभागनिहाय परवानगी आकडेवारी

नोपाडा विभाग : १९ अर्ज तर, परवानगी शून्य

कोपरी विभाग : १० अर्ज तर, परवानगी शून्य

वागळे विभाग : १६ अर्ज तर, परवानगी शून्य

लोकमान्यनगर-सावकरनगर : २६ अर्ज तर, परवानगी ५

वर्तकनगर विभाग : २१ अर्ज तर, परवानगी २

माजिवडा-मानपाडा विभाग : ४६ अर्ज तर, परवानगी १७

उथळसर विभाग : १८ अर्ज तर, परवानगी शून्य

कळवा विभाग : २३ अर्ज तर, परवानगी शून्य

मुंब्रा विभाग : १ अर्ज तर, परवानगी शून्य

दिवा विभाग : १२ अर्ज तर, परवानगी शून्य