Thane Commuters Struggle : नवरात्रौत्सव सुरु होताच ठाणे शहरातील कोंडीत गेले काही दिवसांपासून आणखी वाढ झाली आहे. राम मारुती रोड, वंदना डेपो, महापालिका भवन, नितीन कंपनी, खोपट, कॅडबरी जंक्शन, वर्तक नगर अशा विविध ठिकाणी सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत असून या कोंडीचा फटका स्थानक परिसरातून सायंकाळच्या वेळी घरी परतणाऱ्या नागरिकांना बसू लागला आहे.

स्थानक परिसरातील शेअर रिक्षा थांबे, मीटर रिक्षा थांबे तसेच सॅटीस पुलावर टीएमटी बससाठी देखील प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागत आहे. रिक्षा तसेच बस वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवासी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे.

ठाणे शहरात घोडबंदरसह मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडी होत असतानाच, आता शहरातील अंतर्गत मार्गांवर देखील कोंडी होऊ लागली आहे. नवरात्रौत्सव सुरू झाल्यापासून ही कोंडी वाढली आहे. शहरातील विविध भागांत देवीचे आगमन झाले असून, अनेक ठिकाणी रास-गरब्याचे आयोजन सुरू आहे.सायंकाळच्या वेळी कुटुंबासह अनेकजण खासगी वाहने घेऊन देवीदर्शनासाठी जात आहेत, तर तरुण मंडळी रास-गरब्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे वाहनांचा ताण वाढून सायंकाळी रस्त्यांवर मोठी कोंडी होत आहे.

त्यात, ठाणे शहराची मानाची मानली जाणारी टेंभीनाका येथील देवीसाठी दरवर्षी चिंतामणी चौकापासून ते टेंभीनाका देवी मंडपापर्यंत रस्ता बंद केला जातो. या मार्गावरील वाहतूक मासुंदा तलावापासून वळसा घेऊन चरईमार्गे तसेच गडकरी रंगायतन मार्गे राममारुती रोडवरुन पुढे सोडली जात आहे. यामुळे सायंकाळच्या वेळी स्थानक परिसरातील राम मारुती रोड पासून ते वंदना डेपो, महापालिका मुख्यालयापासून ते नितीन कंपनी आणि ज्ञानेश्वर नगर ते कामगार नाका याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. तसेच खोपट, कॅडबरी जंक्शन, वर्तकनगर या भागात देखील काही प्रमाणात कोंडी होत आहे.

या वाहतूक कोंडीत रिक्षा टीएमटी गाड्या अडकून राहत आहेत. परिणामी, सायंकाळच्यावेळी कामावरुन घरी परतणाऱ्या नागरिकांना स्थानक परिसरातून रिक्षा तसेच बस मिळण्यास विलंब होत आहे.

गेले तीन ते चार दिवसांपासून स्थानक परिसरातील गावदेवी मंदिर, गावदेवी मैदान, बी कॅबीन, मोह विद्यालय अशा विविध भागातील शेअर रिक्षा थांब्यावर सायंकाळच्या वेळी प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास तर, अनेक एक तास रिक्षाच्या रांगेत उभे राहिल्यानंतर रिक्षा उपलब्ध होत आहेत. रिक्षा वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकजण टीएमटी बसचा पर्याय अवलंबत आहेत. परंतू, सॅटीस पुलावर देखील टीएमटी बस गाड्यांसाठी प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. यामुळे प्रवासी वर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेले दोन ते तीन दिवसांपासून स्थानक परिसरातून रिक्षा मिळणे कठीण झाले आहे. प्रवासी रांगेच्या येथून काही रिक्षा रिकाम्या जातात. परंतू, कोंडी चे कारण पुढे करुन ते प्रवासी वाहतूक घेण्यास नकार देतात. यामुळे रिक्षा मिळण्यास आणखी उशिर होतो. – दीपेश जाधव, प्रवासी.