Thane News : ठाणे : कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची काही महिन्यांपूर्वी साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कळव्यात शरद पवार गटाची ताकद कमी झाल्याचे बोलले जात असतानाच, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने ठाणे जिल्ह्यात पुन्हा संघटनबांधणीस सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कळवा परिसरातील पत्रकारांशी संवाद साधताना पक्ष सोडुन गेलेल्या माजी नगरसेवकांना खुले आव्हान दिले.
कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची काही महिन्यांपूर्वी साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कळव्यात शरद पवार गटाची ताकद कमी झाल्याचे चित्र होते. असे असतानाच, काही दिवसांपूर्वी माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश बर्डे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनीही नुकताच प्रवेश केला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढीस लागल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कावेरी सेतु येथील कार्यालयात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार, ॲड. कैलास हावळे (अध्यक्ष – कळवा ब्लॉक) यांनी दिपावली स्नेहसंमेलन आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान ( Manoj Pradhan ) यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी अनेकांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ,ऋता आव्हाड, नताशा आव्हाड, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका वर्षा मोरे, युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, श्रीकांत भोईर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अनेकांचा पक्ष प्रवेश
या कार्यक्रमादरम्यान कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा करलाद, प्रशांत जाधव, सुरेश साळवे, साहिल आणि त्यांच्या असंख्य समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान यांनी, पक्ष सोडुन गेलेल्या माजी नगरसेवकांना खुले आव्हान दिले.
कळव्याची ताकद आव्हाडांच्याच पाठीशी
कळवा हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण हा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ आहे. येथील ९ नगरसेवकांनी पक्ष सोडून सत्तेकडे वाटचाल केली, पण त्यांना हे समजले नाही की, कळव्याची खरी ताकद आजही आव्हाड साहेबांच्याच पाठीशी आहे, असे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले.
कळव्यातील १६ पैकी १६ जागा जिंकणार
आज परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा पाठिंबा आमच्याकडे आहे. नव्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आम्ही ठाम सांगू शकतो — शंभर दिवसांचे लक्ष्य ठरवले असून कळव्यातील १६ पैकी १६ जागा आम्हीच जिंकणार, असा दावा त्यांनी केला.
पक्ष सोडून गेलेल्यांना खुले आव्हान
बूथनिहाय काम सुरू झाले आहे. महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने पक्षाशी जोडले गेले आहेत. आता आम्ही एक मजबूत संघटन उभारणार आणि कळव्यात नव्या उर्जेने झेंडा फडकवणार आहोत. तसेच आम्हाला सोडून गेलेल्यांचे पानिपत केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
