Chicken and mutton sales after Ganpati, Thane: ठाणे: गणेशोत्सवानंतर अनेक मांसाहारप्रेमींनी बाजारात मासे, मटण, चिकन खरेदीला गर्दी केली आहे. श्रावण महिना तसेच त्यापाठोपाठ येणारा गणेशोत्सव याकालावधीत अनेकजण मांसाहार करणे टाळतात. अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मांसाहरप्रेमी पुन्हा त्यांचा मोर्चा मांसाहाराकडे वळवतात. यंदा अनंत चतूर्दशीनंतर लागूनच रविवार आल्यामुळे मांसाहारप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे. आज, सकाळ पासून ठाण्यातील मांस विक्रीच्या दुकानात ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
धार्मिक प्रथेनुसार श्रावण महिना आणि त्यापाठोपठ येणारा गणेशोत्सव जवळपास या एक महिन्याच्या कालावधीत अनेकजण मांसाहाराचे सेवन करणे टाळतात. त्यामुळे या काळात मांसाहार खरेदीसाठी बाजारपेठा तुलनेने ओस पडतात. यंदा अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी आली होती. त्यामुळे अकरा दिवसानंतर शनिवारी गणपतीचा विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. यंदा गणपतीच्या विसर्जनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवार आला आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे ठाणे शहरातील चिकन, मासे मटण विक्रीच्या दुकानात सकाळपासून ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे.
श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात आम्ही केवळी १५ ते २० कोंबड्या विकत होतो. परंतू, आज सकाळपासून आम्ही ५० ते ६० कोंबड्यांची विक्री केली आहे, अशी माहिती जांभळी नाका बाजारातील कोंबडी विक्रेते वासीम पवार यांनी दिली. काही ठिकाणी चिकन, मटण आणि मासे च्या किंमतीत काहीप्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: दारादारातून फिरणारे मासे विक्रेते यांच्याकडे देखील मासळी खरेदीला मोठी मागणी दिसून आली. गणेशोत्सवाच्या काळात विक्री खूपच कमी होती. पण, अनंत चतुर्दशी संपल्यानंतर विक्री दुपटीने वाढली आहे. रविवारी सकाळीच स्टॉल रिकामे झाले, असे ठाण्यातील एका मासळी विक्रेत्याने सांगितले. मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या दुकानातही असेच काहीसे चित्र होते.
श्रावणानंतर कुटूंब, मित्र-मैत्रिणींसह पार्टीचा बेत
श्रावण आणि गणेशोत्स जवळपास एक महिना मांसाहाराचे सेवन केले जात नाही. त्यामुळे अनंत चतूर्दशी होताच, अनेकजण कुटूंबासह तसेच मित्र-मैत्रिणींसह पार्टीचे बेत आखतात. यंदा रविवार आल्यामुळे अनेकांनी असे पार्टीचे बेत आखले असल्याचे दिसत आहेत.
असे आहेत चिकन-मटण चे दर
एक महिन्यानंतर चिकन -मटणच्या मागणीत वाढ झाल्यामुळे काही विक्रेत्यांनी किंचीत चिकन -मटणच्या दरात वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मटण ८०० रुपये प्रति किलोने तर, चिकन २२० ते २४० रुपये प्रति किलोने विक्री केले जात असल्याची माहिती ठाण्यातील चिकन मटण विक्रेते शोहेब शेख यांनी दिली.
पितृपक्ष आणि ग्रहणाचा काहीसा फटका
अनंत चतुर्दशी नंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष सुरु होतो. त्यामुळे धार्मिक श्रद्धेनुसार काहीजण पितृपक्षात देखील मांसाहाराचे सेवन करीत नाही. त्यात, यंदा अनंत चतुर्दशीला लागून दुसऱ्या दिवशी ग्रहण देखील आले आहे. त्यामुळे मांसाहाराच्या विक्रीवर काहीसा फटका बसला असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.