ठाणे – अवयव दान सप्ताह निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अवयव दान च्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविले जाणार आहेत. समाजात अवयव दानाविषयी सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळवून देण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळावा असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अवयव दानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी शैक्षणिक सत्रे, चर्चासत्र, जनजागृती रॅली, पोस्टर प्रदर्शन आणि वैद्यकीय मार्गदर्शन शिबिरे ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. दरवर्षी हजारो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय, फुफ्फुसे इत्यादी अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत राहतात. एका व्यक्तीच्या अवयव दानाने आठ जणांपर्यंतचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे अवयव दान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, ती एक श्रेष्ठ सामाजिक आणि मानवी मूल्यांची अभिव्यक्ती आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
शासकीय कार्यालयांसह शाळा महाविद्यालयांना आवाहन
अवयव दान ही आपल्या इच्छेने आणि जागरूकतेने घ्यायची सामाजिक जबाबदारी आहे. आपण स्वतः पुढाकार घेतल्यास आपल्या कृतीमधून इतरांनाही प्रेरणा मिळू शकते. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात येत आहे.
मृत्यूनंतर अवयव दान करून आपण अनेक जिवांना पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतो. प्रत्येक नागरिकाने अवयव दानाचा निर्णय घेऊन कुटुंबासोबत या विषयी संवाद साधावा. – रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद, ठाणे.
अवयव दान ही एक संवेदनशील आणि सशक्त सामाजिक जबाबदारी आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता, वेळेवर मिळालेला अवयव एखाद्या रुग्णासाठी जीवन वाचवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अवयव दानासंदर्भात भीती किंवा गैरसमज बाजूला ठेवून माहितीपूर्ण निर्णय घ्यावा. – डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी.