Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : ठाणे : ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असताना ठाण्यात राहणाऱ्या सामाजिक संघटनांकडून त्यांना विविध माध्यमातून मदतीचा हात दिला जात आहे. परंतु मदत करणाऱ्यांची पोलीस अडवणूक करत असल्याचा गंभीर आरोप ठाण्यात राहणारे मराठा बांधव करत आहेत. ठाण्याच्या वेशीपासूनच आमची अडवणूक होत आहे. पोलिसांच्या बंदोबस्ताचे अनेक टप्पे पार करत हे मराठा बांधव जेवण घेऊन आझाद मैदानापर्यंत पोहचत आहेत.

इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा आदेश निघेपर्यंत माघार नाही, या भूमिकेवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे ठाम असल्याने हजारो मराठा आंदोलक हे मुंबईत ठाण मांडून आहेत. परंतु सरकारने या आंदोलकांची पुरेशी व्यवस्था केली नसल्याने या आंदोलकांचे मोठे हाल होत आहे.

मुंबईतील अनेक हाॅटेल बंद आहेत. त्यामुळे या आंदोलकांना दोनवेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. पिण्यासाठी पाणी नाही, जेवण नाही. त्यात पाऊस पडत असल्याने आंदोलकांचे मोठे हाल होत आहेत. या आंदोलकांना मदत व्हावी यासाठी आता विविध संघटना पुढे सरसावत आहेत. ठाण्यातील नांदेड जिल्हा सामाजिक आणि सखल मराठा समाज एकत्र येऊन येऊन चार ते पाच टेम्पो भरून चहा, नाश्ता, जेवण, फळे मराठा आंदोलकांसाठी नेत आहेत. परंतु आमची अडवणूक होत असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.

मदत करणारे मराठा काय म्हणताय..

आम्ही कोणत्याही पक्षाकडून देणगी किंवा इतर काही न घेता स्वखर्चाने मराठा आंदोलकांना मदत पोहचवित आहोत. परंतु ठाण्यातील आनंदनगर टोलनाका, शिवडी, डाॅकयार्ड येथे शनिवारी आणि रविवारी आमची अडवणूक पोलिसांकडून झाली. अनेक प्रश्न पोलिसांकडून विचारले जातात. अनेक अडथळे पार करत आझाद मैदानापर्यंत पोहचत असल्याचे संस्थेचे पदाधिकारी सागंत आहेत.