कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील एका अतिथी गृहात आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या दोन जणांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केली. ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या एकूण १३ जणांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
भावीन अनम (२६), मयूर व्यास (२५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. या संधीचा फायदा घेत सट्टे खेळण्यात तंत्रज्ञ असलेल्या भावीन, मयूर यांनी पैसा कमविण्याच्या आमिषातून आयपीएलवर सट्टा लावून इच्छुकांना जाळ्यात ओढण्याची शक्कल लढविली. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानक भागातील बोरगावकर वाडीतील कल्याण ॲनेक्स अतिथी गृहातील १६० क्रमांकाची खोली भाड्याने घेतली. तेथे त्यांनी मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून सट्ट्यासाठी सात ते आठ संकेतस्थळ तयार केली. या माध्यमातून सट्टयाचा खेळ सुरू केला.
बुधवारी भावीन, मयूर यांनी आरसी विरूध्द आरआर संघावर सट्टा लावला होता. त्यांच्या सोबतीला ऑनलाईन १३ जण सहभागी झाले होते. या सट्ट्याची कुणकुण महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना लागली. त्यांनी १६० क्रमांकाच्या खोलीत सट्टा चालू असल्याची गुप्त माहिती काढली. तेथे अचानक छापा टाकून खोलीतून भावीन, मयूरला अटक केली. सट्ट्याच्या साहित्यासह मोबाईल आरोपींकडून जप्त केले.
त्यांनी सट्टा खेळत असल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. आतापर्यंत सट्ट्यामध्ये या दोघांनी किती जणांना जाळ्यात ओढले याचा तपास सुरू आहे. ऑनलाईन सट्ट्यात सहभागी झालेल्या सट्टेबाजांचाही पोलीस शोध घेत आहेत.