कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक भागात संंशयास्पदरित्या फिरणाऱ्या सहा महिला आणि एक पुरूष अशा बांग्लादेशी नागरिकांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मागील दोन दिवसात अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतीय वास्तव्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. ते बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करून तेथून रेल्वेने कल्याण शहरात आले असल्याची कबुली या बांग्लादेशी नागरिकांनी पोलिसांना दिली आहे.
महात्मा फुले पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल भुजबळ मंगळवारी कल्याण रेल्वे स्थानक भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना सहा महिला रेल्वे स्थानक भागात संशयास्पद हालचाली करत आहेत असे आढळून आले. गस्ती पथकातील महिला हवालदार धनगर यांनी त्या महिलांच्या दिशेने जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली.
त्या महिला बांग्लादेशी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडे भारतात राहण्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यांच्या जवळील मोबाईलमध्ये ईमो उपयोजन स्थापित होते. त्यांचे मोबाईल अधिक ८८ क्रमांकाने सुरू होणारे होते. त्यांनी भारतातून बांग्लादेशात उपयोजनातून संवाद, संपर्क साधले असल्याचे आढळले. या महिलांकडे बांग्लादेशचे जन्म प्रमाणपत्र, बांग्लादेश राष्ट्रीय ओळखपत्र आढळून आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानक भागात पोलिसांना गस्त घालताना एक तरूण आढळला. त्याची विचारपूस केल्यावर त्याने आपण बांग्लादेश असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या तरूणाकडे बांग्लादेशचा रहिवासी असल्याची कागदपत्रे आढळून आली आहेत.
पारपत्र नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्य पध्दतीने भारतात वास्तव्य केल्याबद्दल या सात जणांवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक, साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल भुजबळ, उपनिरीक्षक जानुसिंंग पवार, हवालदार साळुंखे, तडवी, वडगावे, कोळे, जाधव यांच्या पथकाने केली.
गेल्या वर्षी कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी शहराच्या विविध भागातून सुमारे ८० हून अधिक बांग्लादेशींनी अटक केली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी नंतर एकत्रितपणे बांग्लादेशात करण्यात आली होती. बांग्लादेशातून येणारे महिला, पुरूष शहराच्या विविध भागातील वाहन दुरुस्ती कार्यशाळा, चालक, हमाली, नृत्याचे बार याठिकाणी काम करतात. कल्याण शिळफाटा, नेवाळी, खोणी तळोजा भागातील बहुतांशी बारमध्ये नृ्त्यांगना, सेविका म्हणून या बांग्लादेशी महिला काम करतात, असे पोलीस तपासात यापूर्वीच उघड झाले आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी विविध बारवर टाकलेल्या छाप्यात अनेक बारमध्ये बांग्लादेशी, ओरिसा, झारखंड भागातील महिला नृत्य करताना आढळून आल्या आहत.