ठाणे : भारत पाकिस्तान या देशांमधील तणावाचे स्थिती निर्माण झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी शुक्रवारी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व पोलीस यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. गृह विभागाने दिलेल्या सूचनानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस दलाला सूचना केल्या. कोम्बिंग कारवाई तसेच स्व रक्षण (मॉक ड्रिल) घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.

भारत पाकिस्तान मध्ये तणावाची परिस्थिती झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शुक्रवारी सायंकाळी एक बैठक घेतली. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

आयुक्तालय क्षेत्रातील धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर या ठिकाणी आवश्यक बंदोबस्त आणि गस्त ठेवण्यात यावी अशी सूचना करण्यात आली. अफवा पसरू नये याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. तसेच समाज माध्यमावर देखील पोलिसांचे लक्ष असणार आहे. ऑल आउट आणि कॉम्बिग कारवाई देखील वाढविण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

हेही वाचा

प्रशासन सज्ज

ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात मॉक ड्रील आयोजित करून कोणत्याही धोकादायक घटनेचा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे. जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर समाज माध्यमावर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेशांवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच भारत-पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.