ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील क्षेत्र असलेल्या येऊरच्या बेकायदा बांधकाम आणि रात्री-अपरात्री होणाऱ्या पार्ट्यांचा मुद्दा विधानसभेत ऐरणीवर येताच ठाणे पोलिसांनी येथील ११० बंगले धारक तसेच इतर बांधकांना नोटीस बजावली असून १३ बंगले मालकांविरोधात नोटीसचा भंग केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच वर्तकनगर पोलिसांकडून नाकाबंदी आणि वाहन तपासणी सुरु झाली आहे. परंतु ही कारवाई कायम राहिल की पुन्हा मद्यपी,पार्ट्या करणाऱ्यांना राजाश्रय मिळतो हे देखील महत्त्वाचे ठरते. दरम्यान, पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल केले. ही कारवाई किरकोळ आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहे. या जंगलामध्ये बिबट्यासह अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. परंतु काही वर्षांमध्ये येथे हाॅटेल, टर्फ, बंगले उभारण्यात आले. काँक्रिटच्या विळख्यात हे जंगल अडकले असून मुंबई उपनगर, ठाणे शहरातील अनेकजण येऊरमध्ये पार्ट्यांसाठी येतात. रात्रीच्या वेळेत उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमुळे येऊरची शांतता नष्ट झाली आहे. शांतता क्षेत्र घोषित असतानाही येथे अनेकदा मोठ्या आवाजाचे ध्वनीक्षेपक वाजवून मद्यपींचा धिंगाणा सुरु असतो. पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी, आदिवासींकडून या जंगलाला वाचविण्यासाठी विविध आंदोलने करण्यात आली. त्यानंतर येऊरच्या बेकायदा बांधकामांचा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही विधानसभेत उपस्थित केला होता.
अखेर मागील आठवडाभरापासून वर्तकनगर पोलिसांनी येऊरमधील ११० बांधकांमाना बीएनएसएसचे कलम १६८ प्रमाणे नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही काही बंगले मालकांनी बेकायदेशीरित्या मागील शनिवारी आणि रविवारी त्यांचे बंंगले पार्ट्यांसाठी भाड्याने दिले होते. अखेर या प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी १३ बंगले मालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक वाजविल्याप्रकरणी तीन तर उर्वरित १० प्रकरणात बंगला भाडेतत्त्वावर दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे हे गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांनी आता आवश्यकतेनुसार किंवा शनिवारी आणि रविवारी येऊरच्या उपवन येथील मुख्य प्रवेशद्वाराबाहेर नाकाबंदी सुरु केली आहे. या नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली जाणार आहे. बेकायदा प्रवेश करणाऱ्यांना यात अटकाव केला जाणार आहे असे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ठाणे पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असले तरी ही कारवाई किरकोळ असल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
येऊरमधील बेकायदेशीर आस्थापनांवर पोलीस, ठाणे महापालिका किंवा वन विभागाकडून कोणतीही कारवाई स्वागतार्ह आहे. तथापि, दुर्दैवाने या कारवाईचे काहीही परिणाम दिसून येत नाहीत. बेकायदेशीर बंगले, हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापने पाडून टाकणे आवश्यक आहे. अशा बांधकामांची संख्या तर वाढलेलीच आहे. विवाह, पार्ट्या इत्यादींसाठी उपलब्ध असलेल्या ठिकाणांची संख्या आणि त्यांच्या वेळापत्रकाची माहिती कोणीही गुगलवर शोधू शकतो. सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक येऊरमधील वन्यजीव आणि आदिवासींना त्रास देत आहे.- निशांत बंगेरा, म्युज फाऊंडेशन.
येऊरमध्ये अनेकजण बेकायदेशिरीत्या आषाढ आमावस्या (गतहारी) निमित्ताने प्रवेश करतात. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी नैसर्गिक धबधबे, नाले, झरे इत्यादी ठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. वन कायद्याचा भंग केल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील कलमांतर्गत कारवाई केली जाणार आहे.