MD Drugs Case : ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका झोमॅटो डिलव्हरी करणाऱ्या तरुणाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीकडून ९२ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईमुळे साधी कामे करणाऱ्या या दोन्ही तस्करांची काळी कृत्य उघड झाली आहे. त्यांनी किती जणांनी अमली पदार्थ विकले आणि हे मली पदार्थ कोणाकडून आणले याचा तपास पोलीस करत आहेत.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कठोर कारवाई करण्याची आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले होते. त्यानुसार, अपर पोलीस आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुन्हे अन्वेषण शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी कारवाई करत होते.

आणि झोमॅटो बाॅय अटकेत…

ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरिश तावडे यांना खबऱ्यांद्वारे माहिती मिळाली होती की, एकजण शिळफाटा भागात अमली पदार्थ घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून शिळफाटा येथील दिवा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर इरफान शेख (३६) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ किलो ५२२ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ आढळून आला. याप्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

इरफान हा पनवेलमध्ये राहणारा असून तो झोमॅटोमध्ये फुड डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करत होता. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावीत, सोमनाथ कर्णवर-पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, दिपक डुम्मलवाड, पोलीस हवालदार हरीश तावडे, अभिजीत मोरे, अमोल देसाई, हुसेन तडवी, अजय सपकाळ, अमित सपकाळ, नंदकिशोर सोनगिरे, गिरीश पाटील, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे, आबाजी चव्हाण, चालक पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली.

गवंडी काम करणारा असा झाला अटक

मुंबई नाशिक महामार्गारील खारेगाव टोलनाका भागात एकजण अमली पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीनंतर २४ जुलैला पोलिसांनी सापळा रचून एक संशयित कार थांबवली. त्या कारची झडती घेतली असता, कारमध्ये ९२ लाख ६८ हजार रुपयांचे एमडी आढळून आले. पोलिसांनी शाहरुख मेदासी उर्फ रिजवान (२८) याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख हा गवंडी काम करतो असे तपासात उघड झाले आहे. ही कारवाई युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, उपनिरीक्षक निलम जाधव, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, पोलीस हवालदार नागराज सोनकडे, प्रशांत निकुंभ, नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, बाळु मुकणे, पोलीस शिपाई मयुर लोखंडे यांनी केली.