ठाणे : ठाणे पोलिसांनी ‘ठाणे पोलीस चॅटबोट’ ही व्हाॅट्सॲप आधारित सेवा नव्याने सुरु केली आहे. या सेवेच्या माध्यमातून आपत्कालीन संपर्क क्रमांक, ई-चलान दंड, भाडेकरु नोंदणी, पोलीस ठाण्याची माहिती, हरविलेल्या वस्तू संदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्दी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरापर्यंत आहे. येथील नागरिकांना अनेकदा किरकोळ कारणांसाठीही पोलीस ठाणे गाठावे लागते. त्यामुळे वेळ देखील वाया जातो. या समस्येवर उपाय म्हणून ठाणे पोलिसांनी आता काही सेवा मोबाईलवर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘ठाणे पोलीस चॅटबोट’ ही व्हाॅट्सॲपवर आधारित सेवा सुरु झाली आहे. याचा क्रमांक ७०३९४५५५५५ असा आहे. यामध्ये ऑनलाईन तक्रार नोंदणी, आपत्कालीन संपर्क क्रमांक, ई-चलान दंड, सायबर गुन्ह्याबाबत माहिती देणे, हरवलेल्या वस्तूंबाबत तक्रार नोंदवणे, भाडेकरू नोंदणी, पोलीस ठाण्याची माहिती, वाहतुक कोंडीबाबत माहिती, संशयास्पद बाबींविषयी माहिती देणे, नवीन कायदे, आपले सरकार सेवा, सुरक्षा उपाय इत्यादी माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, नागरिक आपला अभिप्राय देखील थेट चॅटबोटद्वारे नोंदवू शकतात असे पोलिसांनी सांगितले.

राज्यातील पहिले सायबर वेलनेस कक्ष कार्यान्वित

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्यातील पहिले सायबर वेलनेस कक्ष ठाणे पोलिसांनी कार्यान्वित केले. रिस्पाॅन्सिबल नेटीझम आणि ठाणे जनता सहकारीबँक यांच्या सहकार्याने हे कक्ष स्थापन झाले आहे. या कक्षामध्ये सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या व्यक्तींचे मानसिक, तांत्रिक आणि कायदेशीर समुपदेशन केले जाणार आहे.