ठाणे : लाल किल्ल्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटानंतर ठाणे पोलीस आणि रेल्वे पोलीस सतर्क झाले आहे. ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसर, वाहन तळ, ठाणे, कल्याण शहरातील माॅल, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातील हाॅटेल, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरु केली आहे. स्थानक परिसरात बाँब शोधक पथके तैनात केली असून समाजमाध्यावरही पोलिसांचे लक्ष आहे.
लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानक परिसरात सोमवारी स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला असून आता महाराष्ट्रातही विशेषत: मुंबई महानगरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात.
मध्य रेल्वेच्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर ही स्थानके अत्यंत महत्त्वाची आहेत. सतर्कतेच्या इशारानंतर रेल्वे पोलिसांनी सर्वच स्थानकात यंत्रणा सतर्क केली. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात पोलिसांच्या श्वानांच्या मदतीने संशयास्पद वस्तू, वाहनांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयास्पद व्यक्तींच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. बहुतांश रेल्वे स्थानकात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.
तर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून शहरातील काही महत्त्वाचे रस्त्यावर नाकाबंदी केली होती. रात्रीच्या गस्ती वाढविण्यात आल्या आहेत. माॅल आणि परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते. तेथेही पोलिसांनी तपासणी सुरु केली. हाॅटेलमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती राहण्यास आले आहेत का, याची तपासणी केली जात आहे. समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे दिशाभूल करणारे समाजमाध्यमावरील वक्तव्य, पोस्टवर देखील पोलिसांचे लक्ष आहे. व्यापाऱ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना संशयास्पद वस्तू, व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.
ठाणे आयुक्लाय क्षेत्रात संशयास्पद काही आढळले नसले तरीही सर्व पोलीस पथके सतर्क आहेत. रात्री नाकाबंदी आणि गस्ती वाढविली आहे. गर्दीच्या ठिकाणी पाहणी सुरु करण्यात आली आहे. हाॅटेल, माॅलमध्ये तपासणी केली जात आहे. समाजमाध्यमावर देखील पथकांचे लक्ष आहे. बाँब शोधक पथके, श्वान पथकांना पाचारण केले असून संशयास्पद वाहने, व्यक्ती आणि वस्तू आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ परिसरातील पोलीस ठाण्यास किंवा ११२ क्रमांकावर संपर्क साधावा. संवेदनशील क्षेत्र परिसरातही पथके पाहणी करत आहेत. – डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण, सह आयुक्त, ठाणे पोलीस.
