कल्याण – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई गावाजवळ मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईगो बारवर (मे. हाॅटेल टुरिस्ट आणि बार) कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी गणेशोत्सवाच्या धामधुमीत रात्री एकच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात तेथे तोकड्या कपड्यात बीभत्स, अंगविक्षेप, अश्लील नृत्य करणाऱ्या १८ बारबालांसह बार परवानाधारक, चालक, २९ ग्राहक अशा एकूण ५६ जणांवर गुन्हा दाखल केला. यावेळी ग्राहक बारबालांवर पैसे उधळत होते, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत असलेला ईगो बार(मे. हाॅटेल टुरिस्ट आणि बार) रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. तेथे हिंदी, मराठी गाण्यांवर अश्लील, बीभत्स गाणी गात बारबाला ग्राहकांना भुरळ घालून वाद्यवृंदाच्या तालावर नाचत असतात, अशा तक्रारी आल्या होत्या. उपायुक्त झेंडे यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली. ईगो बारवर कारवाई करण्याची जबाबदारी मानपाडा पोलिसांऐवजी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांना दिली. उपायुक्तांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे आणि पथकाला काटई गाव हद्दीतील ईगो बारवर छापा टाकण्याची सूचना केली.

बाजारपेठ पोलिसांचे पथक रात्री एकच्या दरम्यान ईगो बारमध्ये शिरले. त्यावेळी तेथे १८ बारबाला तोकड्या कपड्यात होत्या. त्या गाण्याच्या तालावर अश्लील, बीभत्स स्वरुपात हातात खानपानाचे पदार्थ, मद्य घेऊन ग्राहकांना भुरळ घालत नाचत होत्या. काही ग्राहक त्यांच्यावर पैशाची उधळपट्टी करत होते. पोलीस बारमध्ये येताच बार व्यवस्थापकांसह बारबाला, ग्राहकांची पळापळ झाली. पोलिसांनी त्यांना जागीच बसण्याच्या सूचना केल्या आणि बारचे सर्व दरवाजे आतून बंद करून घेतले. पोलिसांनी १८ बारबाला, २९ ग्राहक, ५ ग्राहक सेवक, बार परवानाधारक संतोष पावशे, बार चालक सतिश शेट्टी, व्यवस्थापक रवींद्र बगेरा, रोखपाल शिवपाल बिरासदार यांची नावे मानपाडा पोलीस ठाण्यातील प्राथमिक तपासणी अहवालात नोंदवली आहेत.

मानपाडा पोलिसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार राहुल ईशी यांच्या तक्रारीवरून १८ बारबाला, बार मालक, चालक, ग्राहक, ग्राहक सेवक अशा एकूण ५६ जणांच्या विरुध्द महाराष्ट्र हाॅटेल, मद्यपान कक्ष (बार) यामधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंंध आणि महिलांच्या (बारबाला) प्रतिष्ठेचे संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. वाद्यवृंदाचे दोन लाख ३६ हजाराचे सामान पोलिसांनी जप्त केले आहे. बहुतांशी बारबाला परप्रांंतीय आहेत. त्या चेंबूर, नवी मुंबई, उल्हासनगर, शिळफाटा भागातील बेकायदा इमारती, अलिशान गृहसंकुलांमध्ये राहत आहेत.

शिळफाटा, मलंगगड, नेवाळी भागात एकूण सुमारे ८० हून अधिक बार आहेत. यामधील काही बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याच्या तक्रारी आहेत. शिळफाटा रस्त्यावरील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या चार ते पाच बारवर यापूर्वी पोलीस उपायुक्त झेंडे यांच्या निर्देशावरून उपायुक्तांचे विशेष पथक, बाजारपेठ पोलिसांनी छापे टाकले आहेत.

दर एक ते दोन महिन्याच्या कालावधीत कल्याण पोलीस परिमंडळात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारवर उपायुक्तांची विशेष पथके छापे टाकून कारवाई करत असल्याने या बारच्या परिसरात राहणारे रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत.