ठाणे : ठाणे महापालिकेच्या लोगोचे स्टीकर वाहनावर लावून त्या वाहनातून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३१ कोटी ८४ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) अमली पदार्थ जप्त केले आहेत. तन्वीर अन्सारी (२३) आणि महेश देसाई (३५) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही आंतरराज्यीय टोळीतील अमली पदार्थ तस्कर असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ तस्करी संदर्भातील गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी बायपास परिसरात काहीजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, उपनिरीक्षक रविंद्र पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली.
पोलिसांनी कारवाई दरम्यान बीएमडब्यू आणि स्विफ्ट वाहने ताब्यात घेतली. स्विफ्ट वाहनातून तन्वीर तसेच बीएमडब्यू वाहनातून महेश याला ताब्यात घेतले. त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता, स्विफ्ट वाहनातून ११ किलो ७६३ ग्रॅम वजनाचे आणि बीएमडब्यू वाहनातून ४ किलो १६१ ग्रॅम वजनाचे असे एकूण १५ किलो ९२४ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या दोघांना पोलिसांनी अटक केली. तन्वीर अन्सारी याच्याविरोधात २०२३ मध्ये मुंब्रा, डायघर आणि २०२५ मध्ये मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. महेश विरोधात कोल्हापूर येथील आजरा पोलीस ठाण्यात २०१८,२०१९,२०२० आणि २०२३ मध्ये चार गुन्हे दाखल होते.
अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आरोपींनी त्यांच्या वाहनावर बेकायदेशीररित्या ठाणे महापालिकेचा लोगोचे स्टिकर वापरले होते. त्यामुळे महापालिकेचा लोगो असलेले स्टिकर आरोपींना सहज कसे उपलब्ध झाले हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यात अनेक वाहनांवर महापालिका किंवा लोकप्रतिनिधींच्या नावाने लोगोचे स्टिकर आहेत. त्यामुळे बेकायदेशिरीत्या या लोगोचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दोघेही तस्कर अमली पदार्थांची मुंबई आणि ठाणे शहरात विक्री करणार होते. या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने तपास सुरू आहे. तसेच बीएमडब्यू वाहनाचा मूळ मालकाला बोलावून त्याचा यात सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.